'या' दोन पाकिस्तानी कलाकारांना मी भारतीय नागरिकत्व मिळवून दिलं - गडकरी

CAA च्या समर्थनाकरता नागपुरात रॅली 

Updated: Dec 22, 2019, 01:19 PM IST
 'या' दोन पाकिस्तानी कलाकारांना मी भारतीय नागरिकत्व मिळवून दिलं - गडकरी  title=

नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेशी संवाद साधला. CAA आणि NRC हे दोन्ही कायदे वेगवेगळे असून CAA हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचं म्हटलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श असून मुस्लिम नागरिक भारतात सुरक्षित असल्याचं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी नितीन गडकरींनी आपण पाकिस्तानी कलाकारांना भारतीय नागरिकत्व दिल्याचं म्हटलं. 

पाकिस्तानी गायक अदनान सामीनेनी नितीन गडकरींकडे भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी विचारणा केली होती. त्यावेळी 'मी अदनान सामीला राजनाथ सिंह यांच्याकडे घेऊन गेलो. मी त्यांना भारताचं नागरिकत्व मिळून दिल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं. 'अदनान सामीने आपल्याला भारतात राहायचं. आपल्याला भारताचं नागरिकत्व हवं असल्याचं मला सांगितलं. त्यानुसार त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं', असं या रॅलीत नितीन गडकरींनी सांगितलं. 

त्याचप्रमाणे अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांना देखील नितीन गडकरींनी भारतीय नागरिकत्व मिळवून दिलं आहे. सलमा आगा या पेशावरच्या असून त्या पृथ्वीराज कपूर यांच्या कुटुंबातील आहेत. 'मी हिंदू आहे. मात्र फाळणी दरम्यान आम्ही पाकिस्तानात राहिलो आणि त्यानंतर आमचं धर्मांतर करण्यात आलं. मला भारताचं नागरिकत्व हवं', अशी मागणी सलमा आगा यांनी गडकरींकडे केली. त्याप्रमाणे त्यांना देखील भारताचं सिटीझनशिप देण्यात आल्याचं गडकरींनी सांगितलं. तसेच 'नागरिकत्व भारतीय सुधारणा कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचं', देखील गडकरी म्हणाले. 

काही दिवसांपूर्वीच गायक अदनान सामी यांनी या कायद्याचं समर्थन केलं होतं. त्यांनी ट्विट करून या कायद्याला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. 'CAB हा कायदा त्या धर्मांच्या लोकांसाठी आहे ज्यांना धर्माशासित देशांमध्ये त्रास दिला जात आहे. मुस्लिम धर्माच्या नागरिकांना पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानात कोणताही त्रास सहन करावा लागत नाही. कारण ते तेथे बहुसंख्यांक आहेत. मुस्लिम समुदाय आताही भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. कायद्यानुसार सगळ्यांच स्वागत आहे', असं ट्विट अदनान सामीने केलं होतं.