सलमानच्या बंगल्यात सापडला ३० वर्षांपासूनचा फरार गुन्हेगार

गेली १५ वर्षे.... 

Updated: Oct 10, 2019, 10:57 AM IST
सलमानच्या बंगल्यात सापडला ३० वर्षांपासूनचा फरार गुन्हेगार
सलमानच्या बंगल्यात सापडला ३० वर्षांपासूनचा फरार गुन्हेगार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बंगल्यावर केअर टेकर म्हणून काम पाहणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. तीस वर्षांपूर्वीच्या एका चोरीच्या गुन्ह्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली. 

शक्ती सिध्देश्वर राणा असं या चोराचं नावं असून मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला सलमानच्या गोराई इथल्या बंगल्यातून बुधवारी अटक केली. गेली १५ वर्षे शक्ती सलमान खानच्या या बंगल्याचा केअर टेकर म्हणून काम करत आहे. 

राणा आणि त्याच्या काही साथीदारांना १९९० मध्ये गुन्हे शाखेकडून चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं. ज्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. पुढे राणा कायमचा पसार झाला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतरही राणा काही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. 

काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना त्याच्याविषयीची माहिती मिळाली होती. गोराई येथील एका घरात तो गेल्या १५ वर्षांपासून राहत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पुढे, अभिनेता सलमान खानच्या बंगल्यावर तो केअर टेकर म्हणून काम पाहत असल्याचंही उघड झालं ज्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणीची पुढील कारवाई प्रतिक्षेत आहे.