लखनऊ : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय.
७ ऑक्टोबरला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प का? असा सवाल, प्रकाश राज यांनी उपस्थित केला होता.
गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली माहिती नाही... मात्र, त्यांच्या हत्येनंतर विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त केला होता, असं प्रकाश राज यांनी म्हटलं होतं. असे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना समाज माध्यमांवर फॉलो करतात... तरीही नरेंद्र मोदी डोळे बंद करून असल्याचंही प्रकाश राज म्हणाले होते. या गोष्टीची आपल्याला भीती वाटते असं म्हणत, आपला देश कोणत्या दिशेला चाललाय? असा सवालही प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात उपस्थित केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी असंच मौन बाळगलं, तर आपण आपल्याला मिळालेले पाच राष्ट्रीय पुरस्कार परत करु, अशी भूमिकाही प्रकाश राज यांनी घेतली होती.... यानंतर प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.