मुलांना जन्म देऊन सोडणाऱ्या अभिनेत्रीवर सरकारची मोठी कारवाई

अभिनेत्रीवर देशातील सराकरानंच कारवाई केली आहे.   

Updated: Aug 31, 2021, 06:23 PM IST
मुलांना जन्म देऊन सोडणाऱ्या अभिनेत्रीवर सरकारची मोठी कारवाई  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : कलाकार हे त्यांच्या रुपेरी पडद्यावरील आयुष्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळंही कायम चर्चेत असतात. कलाकारांच्या खासगी आयुष्यातील  घडामोडींबाबत सर्व गोष्टींसंदर्भात कुतूहलाची भावना व्यक्त केली जाते. यातच अता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे, जिथं एका अभिनेत्रीवर देशातील सराकरानंच कारवाई केली आहे. 

हे सर्व भारतात नव्हे, तर चीनमध्ये घडत आहे. चीनमध्ये नव्या नियमाअंतर्गत आता सेलिब्रिटी चांगलेच अडचणीत येऊ लागले आहेत. चीनमध्ये पगार, मिळकतीमध्ये असणाऱ्या तफावतीला कमी करण्याच्या हेतूनं ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आता येथील लोकप्रिय अभिनेत्री झेंग शुआंग (Zheng Shuang) कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. 

तिला 46 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 338 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शांघाईमधील करवसुली विभागानं तिच्यावर करासंबंधीची संपूर्ण माहिती न दिल्यामुळं ही कारवाई केली आहे. शांघाय म्युनिसिपल टॅक्स सर्विसनं अभिनेत्रीला एका टीव्ही सीरिजच्या चित्रीकरणादरम्यान 2019 आणि 2020 दरम्यान मिळकतीची सर्व माहिती न दिल्यामुळे आणि कर बुडवल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. 

झेंगवरील या कारवाईनंतर तिच्या कोणत्याही कार्यक्रमाचं प्रसारण न करण्याच्या घोषणा नॅशनल रेडिओ आणि टेलिव्हिजन अॅडमिनिस्ट्रेशननं दिली आहे. सरोगसीच्या माध्यमातून झालेल्या दोन मुलांना अमेरिकेतच सोडून आल्याप्रकरणीही तिच्यावर अनेकांचाच रोष ओढावला होता असं म्हटलं जातं. 

दरम्यान, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावलेली असमानता, वाढतं कर्ज, कमी होणारा वस्तूंचा खप या साऱ्याशी दोन हात करण्यासाठी आयटी, ऑनलाईन शिक्षण, भूखंड उद्योग आणि इतरही व्यवसायांविरोधात कारवाई केली आहे. यामध्ये अलिबाबाचाही समावेश आहे.