CID fame Dinesh Phadnis Death : 'सीआयडी' या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमध्ये 'फ्रेड्रिक्स'ची भूमिका साकारणारे अभिनेता दिनेश फडणीस यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे. दिनेश यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे म्हटले जात आहे. काल रात्री म्हणजेच 4 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज 5 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिनेश यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. इतकंच नाही तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता असे देखील म्हटले जात होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कारण हृदयविकाराचा झटका नसून दुसरा आजार होता. त्याची माहिती CID या मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीनं दिली होती.
दरम्यान, दिनेश हे लिव्हर डॅमेजच्या समस्येनं त्रस्त होते. याआधी अशा बातम्या आल्या होत्या की दिनेश यांना हृदयविकाराचा झटका आला होता. या बातमीलाच दयानंद शेट्टीनं फेटाळून लावले होते आणि म्हटले की त्याचे लिव्हर खराब झाले आहे. दिनेश यांचे जवळचे मित्र दयानंद शेट्टी यांनी 'ईटाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'हो, त्यांचे निधन झाले हे खरे आहे. हा प्रकार सकाळी 12.08 च्या सुमारास घडला. मी सध्या त्याच्या घरी आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सीआयडीचे जवळपास सर्वच लोक आता येथे हजर आहेत.'
दिनेश त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात आता पत्नी नयना आणि लहान मुलगी तनु असं कुटुंब आहे. दिनेश फडणीस या शोमध्ये फ्रेड्रिक्स म्हणून ओळखले जातात. भारतीय दूरचित्रवाणीवरील सर्वात प्रसिद्ध शो 'सीआयडी'मध्ये त्यांनी काम केले होते. त्यामुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. ते 1998 ते 2018 या काळात शोमध्ये दिसले. इतर कलाकारांच्या तुलनेत दिनेश यांची फ्रेड्रिक्स ही भूमिका लहानमुलांमध्ये जास्त प्रसिद्ध होती. दिनेश यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं.