मुंबई : पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून दिसत आहे. प्रोमोमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे येतात. एका वडील आणि मुलीची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, " काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती. एआयच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलीच्या शोधात असलेल्या बापाचा प्रवास हा विषय फार आधीपासून माझ्या डोक्यात होता. तेच 'धर्मा- दि एआय स्टोरी'च्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांना या विषयाबद्दल फारसे माहित नसेल, त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय नक्कीच समजेल. परदेशात फिल्मच्या शुटिंगदरम्यान मला थोडी दुखापतही झाली, परंतु तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप बाहेर आलो आणि आता येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम सोबत असूद्यात."
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून काही दिवसांपुर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. बियु प्रॉडक्शन निर्मित 'धर्मा- दि एआय स्टोरी'चे पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.