'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...'

अमिषा पटेलने जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून तिला उत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 2, 2023, 12:50 PM IST
'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...' title=

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सलग 3 सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही अमिषा पटेलची गणना बॉलिवूडमधील अपयशी अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यातीलच एक चित्रपट असणाऱ्या गदरच्या सिक्वेलने अमिषा पटेलसाठी पुन्हा एकदा बॉलिवूडचे रस्ते खुले केल्याचं दिसत आहे. गदर 3 च्या यशामुळे अमिषा पटेल चर्चेत असताना, यादरम्यान ती आपल्या विधानांनी वाद निर्माण करतानाही दिसत आहे. नुकतंच तिने 'बॉलिवूड हंगामा'ला मुलाखत देताना जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अमिषा पटेलने काय म्हटलं आहे?

अमिषा पटेलने जर 'गदर 3' चित्रपटात तारा आणि सकीना यांच्या वाट्याला जास्त स्क्रीन टाइम नसल्यास आपण नकार देणार असल्याचं म्हटलं आहे. तिने सांगितलं की, "मी कथा ऐकतानाच स्पष्ट करणार आहे. पण जर काही कारणास्तव तारा आणि सकीना यांना चित्रपटात जास्त वेळ एकत्र दाखवलं जाणार नसेल तर मी हा चित्रपट करण्यास नकार देणार आहे. मी तो चित्रपट करणारच नाही".

"मी माझ्या चाहत्यांना नाराज करणार नाही, कारण मला माहिती आहे की, त्यांना तारा आणि सकीना यांना एकत्र पाहायचं आहे. त्यांना हे देणं ही आमची जबाबदारी आहे. शेवटी ते तारा आणि सकीना यांना पाहण्यासाठीच चित्रपटगृहात येत आहेत. प्रेक्षक या दोन्ही भूमिकांवर प्रेम करतात. ज्याप्रमाणे केट विन्सलेट आणि लिओनार्डा यांच्याशिवाय टायटॅनिक चित्रपट असू शकत नाही, तसंच हे आहे," असं अमिषा पटेलने सांगितलं आहे. 

अनिल शर्मा यांनी दिलं उत्तर - 

अनिल शर्मा यांनी बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना अमिषा पटेलच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली. अमिषा पटेल काय विचार करते, याच्याने काही फरक पडत नाही असं ते म्हणाले आहेत. "चित्रपट तयार होत असताना अमिषा फार काही बोलली होती. मला त्यावर आता भाष्य करायचं नाही. मी तिचा आदर करतो आणि यापुढेही करत राहीन. सकीना हे पात्र माझ्या मनातून जन्माला आलं आहे, तिच्या नाही. गदर 3 मध्ये काय होईल याची मलाही अद्याप कल्पना नाही. तिच्या विचार करण्याने काय फरक पडणार आहे? पण ती गदरशी इतकी जोडली आहे याचा आनंद आहे. त्यासाठी मी तिचे आभार मानतो. चांगलं बोलायचं की वाईट ही त्यांची इच्छा". 

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अमिषा पटेलने अनेक आरोप केले होते. चित्रपटाच्या सेटवर योग्य सुविधा नसणं, पैसे न मिळणे अशा अनेक आरोपांचा त्यात समावेश होता. पण नंतर अमिषा पटेल आणि अनिल शर्मा यांच्यातील वाद मिटल्याचं दिसत होतं. ट्रेलर लाँचवेळी अमिषा पटेलने अनिल शर्मा यांचं कौतुक करताना आमच्यात मुलगी आणि वडिलांप्रमाणे नातं असल्याचं म्हटलं होतं. तिने सांगितलं होतं की "अनिल शर्मा परफेक्शनिस्ट आहेत. आमच्यात मुलगी आणि वडिलांप्रमाणे नातं आहे. आम्ही फार भांडतो. ते मला नाराज करत असतात आणि मी भांडत असते. मी त्यांना व्हॉट्सअप आणि इन्स्टावर ब्लॉक केलं होतं. नंतर अनब्लॉकही केलं. आमचं नातं असंच आहे".