कोरोनाचा असाही फायदा.... महेश मांजरेकर घेतायंत कलाकारांची ऑडिशन

सध्या मुंबईत सुरु असणाऱ्या अनेक मालिकांचे चित्रीकरण कोरोनामुळे ठप्प झाले आहे

Updated: Mar 20, 2020, 03:48 PM IST
कोरोनाचा असाही फायदा.... महेश मांजरेकर घेतायंत कलाकारांची ऑडिशन title=

मुंबई: सतत धावपळ सुरु असणाऱ्या मुंबईचा वेग सध्या कोरोना व्हायरसच्या (COVID-19) दहशतीमुळे मंदावला आहे. शहरातील सर्वच घटक आणि उद्योगांना याचा फटका बसला आहे. मनोरंजन क्षेत्रही याला अपवाद नाही. सध्या मुंबईत सुरु असणाऱ्या अनेक मालिकांचे चित्रीकरण कोरोनामुळे ठप्प झाले आहे. इंडस्ट्रीत बऱ्यापैकी स्थिरावलेल्या कलाकारांना याचा फार मोठा फटका बसणार नाही. मात्र, अभिनयात आपले नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आलेल्या नवख्या कलाकारांना आता पुढील काही दिवस काय करायचे, असा प्रश्न पडला असेल.

अशा कलाकारांसाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक नामी शक्कल शोधून काढली आहे.  त्यांनी नवख्या कलाकारांना घरबसल्या व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. यासंदर्भात महेश मांजरेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. 
आपण या फावल्या वेळेत कलाकारांच्या ऑडिशन्स घेणार असल्याचे मांजरेकर यांनी जाहीर केले आहे. कोरोनामुळे सध्या शुटिंग्ज बंद आहेत. नाटकांचे प्रयोगही थांबलेले आहेत. त्यामुळे घरी बसून काय करायचे हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा लोकांसाठी माझ्या मनात एक विचार आला आहे. 

बऱ्याच काळापासून मी ऐकतोय की माझ्या किंवा माझ्या कंपनीच्या नावाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी auditions सुरु असतात. त्यावर काहीतरी इलाज करायचा असं बरेच दिवस डोक्यात होतं. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी कधीही अशा auditions घेत नाही. पण आता पहिल्यांदा मी Online Audition चं आवाहन करतोय. तुम्ही कोणत्याही वयातले असाल, तुम्हाला अभिनयाची आवड असेल, तुमचं अभिनयाचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला आवडतील ते डायलॉग्ज, आवडेल तो परफॉमर्न्स आम्हाला मोबाईलवर शूट करुन पाठवा, सोबत तुमची माहिती, तुमचे फोटो, संपर्क क्रमांकही पाठवा. यासाठी ई-मेल आयडी आहे - talentbank2020@gmail.com माझी टीम (जी सध्या घरीच बसलेली आहे) ते या माहितीचं संकलन करतील. तुमचं नाव आमच्याकडे रजिस्टर केले जाईल, असे महेश मांजरेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.