दिग्दर्शक राम गोपाल वर्मा वादाच्या भोवऱ्यात; गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करण्याचे मुख्य कारण त्यांचा आगामी चित्रपट 'मर्डर' आहे.  

Updated: Jul 5, 2020, 01:22 PM IST
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा वादाच्या भोवऱ्यात; गुन्हा दाखल  title=

मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या विरोधात मिरयालागुडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याचे मुख्य कारण त्यांचा आगामी चित्रपट 'मर्डर' आहे. न्यायालयाच्या आदेशावरून तेलंगना पोलिसांनी वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फादर्स डेचं औचित्य साधून त्यांनी 'मर्डर' चित्रपटाची घोषणा केली. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच चित्रपट निर्माते नट्टी करूणा यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पी. बालास्वामी यांनी दाखलल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पी. बालास्वामी यांचा मुलगा प्रणय कुमार याची २०१८ साली हत्या करण्यात आली होती. प्रणयने उच्चवर्णीय मुलीसोबत लग्न केले होते. त्यामुळे प्रणयचा सासरा मारूती राय याने त्याची हत्या केली होती. 

दरम्यान, चित्रपटात प्रणय आणि सून अमृता यांचे फोटो कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता चित्रपटात वापरल्यामुळे पी. बालास्वामी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्यात न्यायालयाचा दरवाजा ठोठावत पी. बालास्वामी यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण
१४ सप्टेंबर २०१८ साली मिरयालागुडा येथे  दलित समुदायातील प्रणय कुमारची हत्या करण्यात आली होती. आई आणि पत्नीसोबत खासगी रुग्णालयातून बाहेर येत असताना त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मारुती राव आणि अन्य काही जणांना अटक करण्यात आली होती. या हत्येसाठी मारुती रावने मारेकऱ्यांना १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती. अखेर २०२० मध्ये मारुती रावने आत्महत्या केली.