दिल कह रहा.... ! पाहा अमेय वाघच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण

त्यानं अनोख्या अंदाजात पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Updated: Jul 5, 2020, 12:26 PM IST
दिल कह रहा.... ! पाहा अमेय वाघच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही नाती किंवा काही व्यक्ती यांचं आपल्या आयुष्यात असणं हेच सर्वतोपरी महत्त्वाचं असतं. जणू काही आपल्या हाताशी एखादा मौल्यवान खजिनाच आहे. त्या व्यक्तीची मिळालेली साथ कोणाच्या जगण्याला अर्थ देते, कोणाचं आयुष्य़ परिपूर्ण बनवते तर कोणासाठी त्या व्यक्तीचं असणंच धीर देणारं असतं. चित्रपट, नाटक, मालिका अशा विविध क्षेत्रांमध्ये अगदी सराईताप्रमाणे वावरणाऱ्या अभिनेता अमेय वाघ याच्याही आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे. 

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमेयच्या आयुष्यातील ही व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी साजिरी देशपांडे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आणि काही अफलातून कॅप्शनसह लक्षवेधी फोटो पोस्ट करणाऱ्या अमेयनं यावेळी थेट स्वत:च्याच विवाहसोळ्यातील एक लहानसा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये साजिरी देशपांडे हिच्यासह त्यानं ज्या क्षणी एका नव्या नात्याची सुरुवात केली त्या क्षणांची झलक चाहत्यांना पाहण्याची संधी मिळत आहे. 

'आज मला साजिरी देशपांडे यांच्या पर्सनल ड्राययव्हरची नोकरी मिळून ३ वर्ष झाली ! आता आयुष्यभरासाठी मी Driving her crazy ! माझ्या नोकरीप्रदान सोहळ्यातील हे काही क्षण!', असं लिहित त्यानं अनोख्या अंदाजात पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सहजीवनाची तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या या जोडीला कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या कलाकार मित्रांनी आणि अर्थातच चाहत्यांनीही खुभेच्छा देत हे क्षण आणखी खास केले. 

खऱ्याखुऱ्या आयुष्यातील आपल्या मालकिणीसोबतचे हे क्षण पोस्ट करणाऱ्या अमेयचा अतिशय सुरेख अंदाज त्यानं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या या काळात जिथं अनेकांनीच परिस्थितीपुढे हात टेकण्याचा मार्ग पत्करला आहे, तिथं अमेयप्रमाणे तुम्हीही बघा आठवणींच्या या वाटेवर चालून, तुमच्या हातीही लागेलच की असा एखादा खजिना....