मुंबई : निर्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी सातत्याने हिट चित्रपट दिले आहेत.
तसंच चांगल्या चित्रपटांच्या पाठीशी प्रस्तुतकर्ते म्हणून खंबीरपणे उभे राहिले आहेत. "दगडी चाळ"च्या यशानंतर अमोल ज्ञानेश्वर काळे निर्मित आगामी."यंटम" चित्रपटासाठी रवी जाधव फिल्म्सची प्रस्तुती असून अतुल ज्ञानेश्वर काळे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित "यंटम" ही टीनएजमधली रिफ्रेशिंग आणि म्युझिकल लव्हस्टोरी असून २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
रवी जाधव यांनी यापूर्वी अभिजित पानसे दिग्दर्शित "रेगे" आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित "कॉफी आणि बरंच काही" हे दोन चित्रपट प्रस्तुत केले होते. अतिशय वेगळ्या धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरले. आता "यंटम" हे आगळंवेगळं नाव असलेला नवा चित्रपट रवी जाधव प्रस्तुत करत आहेत त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढलं आहे.
"चौर्य" या पहिल्याच चित्रपटातून लक्ष वेधलेल्या समीर आशा पाटीलनं "यंटम" या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा- पटकथा-'संवाद समीरसह मेहुल अघजा यांनी लिहिले आहेत."यंटम' या चित्रपटात टीनएज लव्हस्टोरी दाखवली जाणार आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन आयुष्याबद्दल काहीतरी वेगळा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे. संगीत हा या चित्रपटाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. मराठी फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित असलेल्या मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना "टाइमपास" या चित्रपटासह अनेक अनेक हिट गाणी दिलेल्या चिनार-महेश या जोडीने या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपट प्रस्तुत करणंयाबद्दल रवी जाधव म्हणाले, '२०१७ ला कच्चा लिंबूमधे अभिनय व न्यूड ( चित्रा ) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हे दोन्ही चित्रपट अत्यंत वेगळ्या धाटणीचे व साकारायला आव्हानात्मक होते. २०१८ हे वर्ष मात्र माझ्यासाठी एकदम वेगळे असणार आहे. या वर्षी काही सहज, सोप्या, सामान्य माणसांच्या स्वप्नांच्या कथा, तर काही असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या प्रेरणादायी कथा लोकांसमोर आणायचा मानस आहे. ‘यंटम’ हे त्यातलेच पहिले पाऊल. ‘यंटम’ म्हणजेच वेडेपणा. आजच्या ग्रामीण महाराष्ट्रातील तरूणांची अत्यंत तरल प्रेमकथा, ज्यात दाहक वास्तवतेचा पदर आहे व प्रेमात काहीही करण्याचा वेडेपणा आहे. मी या आधी अभिजित पानसे व प्रकाश कुंटे ह्या नव्या दमाच्या टॅलेटेड दिग्दर्शकांचे चित्रपट प्रस्तुत केले आहेत.
त्यात आता समीर आशा पाटील या तरूण टॅलेंटेड दिग्दर्शकाचे नाव सामील होत आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून सयाजी शिंदेसारख्या मात्तबर कलाकारासोबत काम करण्याचाही योग जुळून येतोय, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटात बरेच कलाकार पहिल्यांदा पडद्यावर काम करीत आहेत. मला आशा आहे, की लोकांपर्यंत हा चित्रपट पोचवण्यात माझा थोडाफार हातभार लागेल व या सर्व नव्या कलाकारांची या क्षेत्रात यशस्वी सुरुवात होईल.'
"यंटम" हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. रवी जाधव यांच्यासारख्या निर्माता दिग्दर्शकानं माझ्या चित्रपटाची प्रस्तुती करणं खूपच आनंददायी आहे. या निमित्तानं हा चित्रपट अधिक चांगल्या रितीने प्रेक्षकांपुढे येईल. "यंटम"मधून प्रेक्षकांना नक्कीच वेगळं काहीतरी पहायला मिळेल,' असं समीरनं सांगितलं.