मुंबई : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतात देखील प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतात देखील कोरोना व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसचा मोठा फटका फिल्म इंडस्ट्रीला होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव पाहता कलाकारांनी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक प्रमोशन दौरे देखील रद्द करण्यात आले आहेत.
५०० कोटी डॉलरचा जगभरातील फिल्म इंडस्ट्रीला तोटा
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातील फिल्म इंडस्ट्रीला तब्बल ५०० कोटी डॉलरचा तोटा झालेला आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. शिवाय लाईव्ह शो आणि चित्रपटगृहांकडे देखील रसिक-प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. अनेक निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता सलमान खानला देखील कोरोना व्हायरसचा मोठा फटका
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे' यंदाच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांच्या भेटीस येणार होता. राधे चित्रपटाची शूटींग थायलँडमध्ये होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे चित्रपटाची शूटींग रद्द करण्यात आली आहे. थायलँडमध्ये देखील कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण अढळले आहेत. त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन देखील रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
धक्कादायक म्हणजे आता पर्यंत संपूर्ण जगात एकूण ९०८३९ नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर ३११० नागरिकांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे.