फराह आणि चुलत भाऊ फरहानमध्ये विस्तवही जाईना...

फराह खान आणि फरहान अख्तर सार्वजनिक कार्यक्रमांत एकमेकांसमोर येणं टाळताना दिसतात

Updated: Jan 23, 2019, 09:52 AM IST
फराह आणि चुलत भाऊ फरहानमध्ये विस्तवही जाईना...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची चुलत बहीण फराह खान यांच्यात काहीतरी बिनसलंय. ९ जानेवारी रोजी बऱ्याचदा आपला वाढदिवस एकत्रच सेलिब्रेट करताना बॉलिवूडला गोळा करणाऱ्या या भाऊ-बहिणीमध्ये काहीतरी खटके उडाल्याचं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही काळानुसार, या दोघांमध्ये बोलणं बंद झालंय. सार्वजनिक कार्यक्रमांत एकमेकांसमोर येणं टाळताना किंवा समोर आलेच तर एकमेकांशी नजर भिडवणं हे दोघेही टाळताना दिसतात. 

#MeToo मोहिमेंतर्गत फराहचा भाऊ साजिद खान याच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अशावेळी आपल्या नातेवाईकांचा आपल्या भावाला पाठिंबा मिळेल अशी कदाचित आशा फराह खानला होती. परंतु, त्यावेळी, साजिदचा चुलत भाऊ फरहान अख्तरनं आपल्या भावावरच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत 'मी साजिदच्या वर्तनावरून आलेल्या बातम्यांमुळे हैराण, अचंबित आणि दु:खी आहे. कसं ते माहीत नाही पण त्याला या आरोपांसाठी निश्चितच प्रायश्चित्त घ्यावं लागेल' अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली होती. तसंच फरहानची बहिण झोया अख्तर हिनंही #MeToo मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला. याच कारणामुळे फराह नाराज असल्याचं समजतंय. 

अधिक वाचा :- #MeToo साजिद खानवरच्या आरोपांवर बहीण - भाऊ म्हणतात...

काही दिवसांपूर्वी कैफी आझमी यांच्या नावानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातही फराह खान आणि साजिद खान गैरहजर राहिले होते. परंतु, इतर अनेक बॉलिवूड पार्ट्या आणि कार्यक्रमांत हे दोघे उपस्थित राहिलेले दिसले. त्यामुळे, आपल्या नातेवाईकांपासून हे दोघे दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहेत.