एआय इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळे सध्या देशभरात खळबळ माजली आहे. अतुल सुभाषने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ शेअर केला आणि सर्व आपबीती सांगितली. याशिवाय त्याने 23 पानांची सुसाईड नोटही मागे सोडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्या पत्नीसह सासरच्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान निकिताला कोर्टात हजर करण्यात आलं असता तिने आपल्या जबाबात अनेक नवे खुलासे केले आहेत.
आम्ही लग्नानंतर हनिमूनसाठी मॉरिशिअसला गेलो तेव्हाच अतुलला माझी तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती असं सांगितलं होतं असं तिने जबाबात सांगितलं आहे. अतलुच काय तर मला लग्नच करायचं नव्हतं. मी दबावात लग्न केलं असा दावा तिने केला आहे.
जेव्हा अतुलने निकिताला विचारलं की, तुला लग्न करायचं नव्हते तर तू माझ्यासोबत असं का केलंस?. यावर निकिताने उत्तर दिलं की, माझ्या वडिलांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्यांच्याकडे जास्त वेळ नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होते. यानंतर आई आणि कुटुंबीयांनी माझ्यावर दबाव आणला आणि मी या लग्नाला संमती दिली.
निकिताने कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या पालनपोषण प्रकरणात जबाब नोंदवला आहे की, अतुल तिला दर महिन्याला खर्चासाठी मुलाच्या नावे काही पैसे तिच्या बँक खात्यात पाठवत असे. बँक खाते लखनौमध्ये आहे. यामध्ये केअर ऑफ आरजे सिद्दिकीच्या नावाने पत्ता नोंदवला आहे. यावरुन या व्यक्तीचा निकिताशी काय संबंध आहेत? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच्यामुळेच निकिताला लग्न करायचं नव्हतं का? अशीही शंका उपस्थित होत आहे.
निकिताच्या जबाबाच्या आधारे तिचा किंवा अतुलचा लखनौशी काहीही संबंध नाही. निकिता जौनपूरची रहिवासी असून अतुल समस्तीपूरचा रहिवासी आहे. निकिताने जबाबात सांगितलंय की, लग्नानंतर ती दिल्लीहून बंगळुरूला शिफ्ट झाली.अतुल तिथे आधीच काम करत होता. आता निकिताच्या बँक खात्यात नोंदवलेल्या या पत्त्यामुळे या व्यक्तीचा निकिताशी काय संबंध आहे? आणि निकिताने लखनऊमध्ये खाते का उघडले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. निकिताने असंही म्हटले आहे की तिने आपला मुलगा व्योमचा वाढदिवस लखनऊमध्ये साजरा केला होता, ज्याचा खर्च अतुलने पाठवला होता. या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
निकिता सिंघानियाने कौटुंबिक न्यायालयात नोंदवलेल्या जबाबात म्हटलं आहे की, लग्नानंतर काही दिवसांपर्यंत तिचे आणि अतुलचे संबंध चांगले होते. दोघेही हनिमूनला गेले होते. अतुलने तिच्यावर विश्वास ठेवला. निकिताने जबाबात म्हटलं आहे की, कोरोना लॉकडाऊनच्या काळात जेव्हा नोकरदार घरात येत नव्हते तेव्हा अतुल तिला घरच्या कामात मदत करत असे. त्याने भांडीही धुतली होती.
निकिताने सांगितलं आहे की, तिचे वडील मनोज सिंघानिया यांची प्रकृती लग्नापूर्वी खूपच खराब होती. ते हृदयाचे रुग्ण होते. यापूर्वी त्यांच्यावर जौनपूर येथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बनारसला नेण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.