मुंबई : संजय लीला भन्साळींचा 'पद्मावती' या सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाही आहे.
सेन्सॉर बोर्डाने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दिला असला तरी पूर्व मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. संजय लीला भन्साळींचा पद्मावती आणि वाद हे जणू समीकरणं बनलयं.सिनेमाचं शूट जेव्हा सुरु झालं तेव्हापासूनचं हा सिनेमा सातत्याने वादाच्या भोव-यात सापडला आहे.
पद्मावती आणि खिलजीवर काही आक्षेपार्ह दृश्य चित्रीत करण्यात आल्याचा आरोप करुन सातत्याने या सिनेमाच्या शूटिंगमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणी सेनेकडून करण्यात आला. त्यामुळेच या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं होतं. या सिनेमाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. सातत्याने वादाचे पडघम वाजल्यानंतर अखेर सेन्सॉर बोर्डाने 'पद्मावती' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र पद्मावतीचा वाद काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. पूर्व मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर आक्षेप घेतलाय.
सेन्सॉर बोर्डाने सहा सदस्यीय समितीला बोलावलं होतं. त्यासंदर्भात आमचे काही प्रश्न होते. मात्र दुसऱ्याच समितीने चित्रपटाला मंजुरी दिली. आपल्या संमतीशिवायच सिनेमाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. 'पद्मावती' चित्रपटाच्या नावात बदल करणं, हा निव्वळ दिखावा आहे.
सीबीएफसीने पद्मावती चित्रपटाला एकही कट सुचवलेला नाही. त्याचप्रमाणे चित्रपटापूर्वी डिस्क्लेमर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच घुमर या गाण्यातही बदल करण्याची सूचना सीबीएफसीने दिलीये... चित्रपटात दाखवलेल्या व्यक्तिरेखेचं वर्णन साजेसं व्हावं, यासाठी हा बदल सुचवल्याचं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींनी स्पष्ट केलंय..तसेच पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचनाही निर्मात्यांना करण्यात आलीये..
इतिहास नाही तर काल्पनिक कवी पद्मावत यांची कलाकृती हा चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही 'पद्मावत' ठेवण्यास सांगितलयं. सुचवलेले बदल दिग्दर्शकाने अंमलात आणल्यास चित्रपटाला प्रमाणपत्र मिळेल.
सेन्सॉर बोर्डाकडून संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला जरी प्रमाणपत्र देण्यात आलं असलं तरीही राजपूत करणी सेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवलाये... अंडर्वल्डच्या भीतीमुळेच सेन्सॉरने सिनेमाला प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. सेन्सॉरने चित्रपटाला प्रमाणित करण्याचा निर्णय घेतला असला तरीही करणी सेना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय..तर भन्साळींनी या सगळ्या प्रकारावर मौन धारण केलंय..त्यामुळे आता या सिनेमावरुन सगळ्यांमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाली असून सिनेमाचं भवितव्य अधांतरिच दिसतयं.