अरिजीत सिंगने गरीब मुलांची मदत करण्यासाठी गायलं Pasoori Remake? समोर आलं वेगळंच सत्य

Did Arijit Singh Sing Pasoori Remake To Support Charity: सोशल मीडियावर अरिजीत सिंगने 'पसूरी' गाण्याचं रिमेक का गायलं आहे यासंदर्भातील एक ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये अरिजीतने यामागील कारण सांगितल्याचा दावा केला जातोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2023, 10:07 AM IST
अरिजीत सिंगने गरीब मुलांची मदत करण्यासाठी गायलं Pasoori Remake? समोर आलं वेगळंच सत्य title=

Did Arijit Singh Sing Pasoori Remake To Support Charity: पाकिस्तानी गायक अली सेठी आणि साई शाही गील या दोघांनी गायलेलं 'पसूरी' गाणं (Pasoori Song) सध्या चर्चेत आहे. 'कोक स्टुडिओ'मधील या गाण्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अगदी भारतामधीलही टॉप 50 गाण्यांच्या यादीत या गाण्याचा समावेश आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभराने 'टी-सिरीज'ने या गाण्याचं रिमेक (Pasoori Remake) बनवलं आहे. 'पसूरी नू' या नावाने कार्तिक आर्यन आणि किआरा अडवणीवर चित्रत केलेलं 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटामध्ये हे गाणं आहे. नव्याने रिलीज करण्यात आलेलं हे गाणं अरिजीत सिंग (Arijit Singh) आणि तुलसी कुमार यांनी गायलं आहे.

अरिजीतवर टीकेचा वर्षाव

सामान्यपणे रिमेक हे ओरिजनलपेक्षा वाईटच असतात असा एक ट्रेण्ड आहे. 'पसूरी' हे गाणं या ट्रेण्डला अपवाद ठरलेलं नाही. या गाण्याचं रिमेक का करण्यात आलं असं अनेक पाकिस्तानीच नाही तर भारतीय चाहतेही विचारत आहेत. मात्र अनेकांनी थेट अरिजीत सिंगलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत तू हे गाणं गाण्यास कसा तयार झाला असा प्रश्न विचारला आहे. अरिजीतवर टीकेचा वर्षाव होत असतानाच त्याने हे गाणं गाण्यामागील कथित खुलासा केला आहे. सध्या हा खुलासा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल ट्वीटचं सत्य समोर आलं आहे.

काय झालंय व्हायरल?

ट्वीटरवरील अरिजीत सिंगचं अकाऊट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हूअॅमआय (@WhoamI) या अकाऊंटवरुन हे गाणं गाण्यास अरिजीत का तयार झाला या मागील कारणाचा खुलासा करण्यात आला आहे. ट्वीटरवरील या अनव्हेरिफाइड अकाऊंटने केवळ चॅरिटी म्हणून म्हणजेच समाजिक कार्यासाठी हे गाणं गायल्याचं म्हटलं आहे. "मला एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की तुमच्या सर्वांचं माझ्यावर असणारं प्रेम पाहून मला फार आनंद होतो. मात्र आता मी तुम्हाला इतरांसाठीही हे प्रेम दाखवा असं सांगेन. मला प्रेम करण्याच्या नादात तुम्ही माझ्या बाजूने बोलताना बाकी लोकांशी वाद घालून आपला वेळ वाया घालवत आहात," असं पहिलं ट्वीट या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. यावर एकाने, "बॉलिवूडमधील पहिल्या क्रमांकाचे गायक असूनही तुम्ही हे असं गाणं का निवडलं? त्याला नकार का दिला नाही," असा प्रश्न विचारला. त्यावर अरिजीतच्या या अकाऊंटवरुन, "गाण्याच्या निर्मात्यांनी मला आश्वासन दिलं की ते गरीब मुलांच्या शाळेसाठी ते वार्षिक निधी देतील. हे महत्त्वाचं आहे, थोड्या शिव्या खाऊ त्यात काय," असं ट्वीट करण्यात आलं आहे.

अकाऊंटचं सत्य काय?

मात्र ज्या अकाऊंटवरुन हे ट्वीट करण्यात आलं आहे ते फेक आहे. पण या खोटारडेपणाला कपिल शर्मासारखा सेलिब्रिटीही बळी पडला असून तो सुद्धा हे अकाऊंट फॉलो करतो. या अकाऊंटवर अरिजीत आणि त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो पोस्ट करण्यात आल्याने वर वर पहिल्यावर हे अरिजीतचं अकाऊंट नक्कीच वाटतं. मात्र हे फेक अकाऊंट आहे. या अकाऊंटला 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. या खात्यावरुन 'पसूरी'संदर्भात अनेक ट्वीट करण्यात आले आहेत. मात्र अरिजीत कधीच अशा प्रकरणांवर भाष्य करत नाही. अरिजीत ट्वीटरवर नाही. तो केवळ इन्स्ताग्राम आणि फेसबुकवर अशून तिथे त्यांचं अकाऊंट व्हेरिफाइड आहे.