मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्याने नैराश्यातून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सुशांत मुळचा बिहारमधील पटना येथील राहणारा होता. त्याच्या मृत्यूनंतर पटनातील राजीव नगरमधील त्याच्या घरी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळत आहे.
सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह यांची तब्येत बिघडली असून ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं, आसपासच्या लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या या घरी एक महिला, केअर टेकर म्हणून असल्याची माहिती आहे. केअर टेकर महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या निधनाची बातमी त्याच्या वडिलांना फोनवरुन देण्यात आली. सुशांतची मोठी बहीण चंडीगढ येथे राहते.
सुशांत सिंग राजपूतला पंख्याला लटकलेलं सगळ्यात पहिले त्याच्या नोकराने पाहिलं. यानंतर त्याने लगेच पोलिसांना फोनकरून याबाबत माहिती दिली. पोलीस सुशांतचा नोकर, त्याचे मित्र आणि शेजाऱ्यांचा चौकशी करत आहेत. सुशांतने आत्महत्या केली असून अजूनतरी काही संशयास्पद आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. सध्या त्याचा मृतदेह मुंबईच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्याच्या आत्महत्येच्या कारणांविषयी अनेक उलटसूलट चर्चा सुरु आहेत.