Zaira Wasim on Viral Photo: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री झायरा वसीमने (Zaira Wasim) 2019 साली चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. इस्लामचा (Islam) दाखला देत झायरा वसीमने (Zaira Wasim) आपण हा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, झायरा वसीम चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असते. इस्लामच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच धर्मावर टीका करणाऱ्यांनाही उत्तर देत असते. नुकतंच तिने ट्विटरला (Twitter) अशा एका फोटोवर व्यक्त होत आपलं मत मांडलं आहे.
ट्विटरवर (Twitter) एका व्यक्तीने मुस्लीम (Muslim) महिलेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मुस्लीम महिला निकाब (Niqab) घालून जेवताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे त्यानुसार महिलेसमोर जेवणाचं भरलेलं ताट असून, जेवताना तिला एका हाताने निकाब पकडावा लागत असून, दुसऱ्या हाताने जेवत आहे. हा फोटो ट्विट करताना युजरने ही खरंच माणसाची इच्छा आहे का? अशी विचारणा केली आहे. त्यावर दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीम (Zaira Wasim) व्यक्त झाली आहे.
झायराने या ट्विटरला उत्तर देताना आपण नुकतंच एका लग्नात अशाच प्रकारे जेवलो असून ही पूर्णपणे माझी निवड असल्याचं म्हटलं आहे. तसंच आम्ही हे तुमच्यासाठी करत नाही असं उत्तर त्या युजरला दिलं आहे.
"नुकतंच एका लग्नाला हजेरी लावली. अगदी अशाच प्रकार जेवले. ही पूर्णपणे माझी निवड आहे. माझ्या आजुबाजूला असणारे अनेकजण मला वारंवार निकाब काढायला सांगत असतानाही मी तो काढला नाही. आम्ही हे तुमच्यासाठी करत नाही. हे समजून घ्या", असं झायरा वसीमने म्हटलं आहे.
Just attended a wedding. Ate exactly like this. Purely my choice. Even when everyone around me kept nagging me that I take the niqab off. I didn’t.
We don’t do it for you. Deal with it. https://t.co/Gu9AXQka8v
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) May 28, 2023
जून 2019 मध्ये झायरा वसीमने फेसबुकला एक सविस्तर पोस्ट शेअर करत धार्मिक कारणांमुळे आपण अभिनय सोडत असल्याचं सांगितलं होतं. आपण येथे अत्यंत योग्यप्रकारे फिट बसले असते. पण मी इथली नाही याची जाणीव झाली आहे असं तिने पोस्टमध्ये सांगितलं होतं.
"पाच वर्षांपूर्वी, मी एक निर्णय घेतला ज्याने माझे आयुष्य कायमचे बदलले. मी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवताच, माझ्यासाठी प्रचंड लोकप्रियतेचे दरवाजे उघडले. मी लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरु लागले. मला यशस्वी चेहरा म्हणून दर्शवण्यात आलं आणि तरुणांसाठी एक आदर्श म्हणून ओळखली जाऊ लागली. पण हे असं काही करण्याची माझी इच्छा नव्हती. विशेषत: माझ्या यश आणि अपयशाच्या कल्पनांच्या संदर्भात, ज्याचा मी नुकताच शोध घेणे आणि समजून घेणे सुरू केले आहे," असं वसीमने पोस्टमध्ये सांगितलं होतं.
झायरा वसीम मूळची काश्मीरची आहे. 2016 मध्ये तिने आमिर खानसह 'दंगल'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तरुण बबिता फोगट या कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. तरुण कुस्तीपटूच्या भूमिकेबद्दल तिला चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली. 2017 मध्ये ती आमिर खानच्या होम प्रोडक्शन 'सीक्रेट सुपरस्टार'मध्ये दिसली होती. प्रियांका चोप्रा, फरहान अख्तरसोबतचा 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसली होती. सोनाली बोसच्या चित्रपटात तिने आयशा चौधरीची मुख्य भूमिका साकारली होती.
नकाब किंवा निकाब म्हणजे चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारं कापड. यामध्ये डोके पूर्णपणे कापडाने झाकलेले असते. इस्लाममध्ये चेहरा झाकण्यास सांगितलेलं नाही. त्यानुसार फक्त डोके आणि केस कापडाने झाकले पाहिजेत. पण कट्टरतावादी देशांमध्ये महिलांना तोंड लपवणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत डोके, चेहरा झाकणे आणि फक्त डोळे उघडे ठेवणे यासाठी मुखवटा वापरला जातो.