90 च्या दशकातील अनेकांच्या मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध सिटकॉम फ्रेंड्समधील (Friends) अभिनेता मॅथ्यू पेरीचं (Matthew Perry) शनिवारी निधन झालं. तो 54 वर्षांचा होता. 90 च्या दशकातील कार्यक्रम फ्रेंड्समध्ये चँडलर बिंगच्या (Chandler Bing) भूमिकेमुळे तो स्टार झाला होता. या कार्यक्रमातील इतर पात्रांप्रमाणे मॅथ्यू पेरीची प्रसिद्धीही प्रचंड होती. इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षक त्याच भूमिकेसाठी त्याला ओळखत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मॅथ्यू शनिवारी लॉस एंजेलिसमधील त्याच्याच घरातील हॉट टबमध्ये मृतावस्थेत आढळळा. मॅथ्यूचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतेही ड्रग्ज सापडलेले नाहीत. दरम्यान पोलीस इतर बाजूंनीही तपास करत आहेत. पण कोणत्याही प्रकारचा कट असल्याचा दावा सध्या तरी फेटाळला जात आहे.
मॅथ्यूच्या निधनानंतर इंस्टाग्रामवरील त्याची शेवटची पोस्ट चर्चेत आहे. याचं कारण या पोस्टमध्ये त्याने त्याच हॉट टबचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये बुडून त्याचं निधन झालं. "ओह, इतकं कोमट पाणी, आजूबाजूला फिरताना बरं वाटतं? असं त्याने फोटो पोस्ट करताना लिहिलं होतं. फोटोमध्ये मॅथ्यू पाण्यात बसलेला असून, मागे निरभ्र आकाश दिसत आहे. दुर्दैवाने ही त्याची शेवटची पोस्ट आणि शेवटचा फोटो ठरला.
मॅथ्यू पेरीचा जन्म 19 ऑगस्ट 1969 रोजी अमेरिकेत झाला. मॅथ्यूने करिअरच्या सुरुवातीला अनेक छोट्या भूमिका केल्या. 1987 ते 1988 पर्यंत 'ब्वॉइज विल बी ब्वॉइज' शोमध्ये चैज रसेली त्याची भूमिका प्रसिद्ध झाली होती. पण फ्रेंड्स मालिकेने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. आजही लोक त्याला त्याच मालिकेसाठी ओळखतात.
फ्रेंड्स सीरीज 22 सप्टेंबर 1994 ला सुरु झाली होती. 6 मे 2004 रोजी मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला होता. 236 एपिसोड्सची सीरिज प्रत्येक अवॉर्ड आपल्या नावावर करत होती.
1994 ते 1998 दरम्यान मॅथ्यू पेरी करिअरमधील सर्वोच्च स्थानावर असतानाच ड्रग्जच्या आहारी गेला होता. यादरम्यान त्याचं वजन वेगाने कमी होत होतं. अनेकदा तर त्याला पुनर्वसन केंद्रात दाखल करावं लागलं होतं अशी कबुली त्याने फ्रेंड्सच्या रियुनिअनमध्ये दिली होती. मला मद्यपान आणि ड्रग्जचं प्रचंड व्यसन असून, मी त्यातून बाहेर पडू शकलो नाही असं त्याने सांगितलं होतं.