'या' चित्रपटामुळे अयोध्येतील राम मंदिराला एका दिवसात 14 लाखांचा नफा; तिकीटबारीवर तुफान गर्दी

First Day Collection Ayodhya Ram Mandir Connection: या चित्रपटाची कथा आणि व्हिएफएक्स उत्तम असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. पहिल्याच शनिवारी या चित्रपटासाठीची मागणी 55.65 टक्क्यांनी वाढली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 14, 2024, 08:55 AM IST
'या' चित्रपटामुळे अयोध्येतील राम मंदिराला एका दिवसात 14 लाखांचा नफा; तिकीटबारीवर तुफान गर्दी title=
चित्रपटाला मिळतोय दमदार प्रतिसाद

Hanu Man First Day Collection: प्रशांत वर्मा यांचा 'हनु मान' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अगदी कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसत आहे. चित्रपटाने तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली आहे. असं असतानाच निर्मात्यांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच एक असं काम केलं आहे की त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 'हनु मान' चित्रपटाच्या निर्मात्यांनी राम मंदिर ट्र्स्टला लाखो रुपये दान म्हणून दिले आहेत. याची माहिती दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांनी केली आहे. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी 'इंडिया टुडे'ला एकूण किती रक्कम दान करण्यात आली याची माहिती दिली आहे.

चाहत्यांकडून कौतुक

या आठवड्यामध्ये कटरीना कैफ-विजय सेतुपती यांचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच महेश बाबूचा 'गुंटूर कारम' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र असं असतानाही 'हमु मान' चित्रपटाची तिकीटबारीवर दमदार घौडदौड सुरु आहे. निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रत्येक तिकीटामागे 5 रुपये या प्रमाणे पैसे अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी ट्रस्टला दान करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या निर्णयाचं कौतुक चाहत्यांकडून केलं जात आहे.

..अन् तो निर्णय घेतला

प्रत्येक तिकीटमागे 5 रुपये यानुसार निर्मात्यांनी आतापर्यंत 14 लाख रुपये दान केले आहेत, अशी माहिती दिग्दर्शक प्रशांत यांनी दिली आहे. आमचे निर्माते फारच धार्मिक आहेत. तसेच जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा आपण त्यातील आनंद वाटून घेतला पाहिजे असं म्हणतात. त्यानुसारच आमच्या निर्मात्यांना राम मंदिराची निर्मिती होत असल्याचं समजल्यानंतर त्यांनी चित्रपट किती कमाई करेल किती नाही याचा विचार न करता प्रत्येक तिकीटामधील 5 रुपये राम मंदिरासाठी दान देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही गोष्ट चिरु सरांना (चिरंजीवी यांना) सांगितली. त्यानंतरच त्यांनी मंचावरुन याची घोषणा केली. पहिल्या दिवशी आम्ही जवळपास 14 लाख रुपये राम मंदिराला दान केले आहेत. चित्रपटाला असाच प्रतिसाद मिळत राहिला तर आम्ही काही कोटी नक्कीच मंदिराला दान करु. 

पुढच्या चित्रपटावर काम

'हनु मान' चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून दिग्दर्शकांनी आपल्या पुढील चित्रपटाबद्दलचं नियोजन सुरु केलं आहे. प्रशांत आता 'जय हनुमान' बनवण्याचा विचार करत आहेत. प्रेक्षकांना चित्रपट आवडतो की नाही याची आम्ही वाट पाहत होते. आता प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असल्याने मी 'जय हनुमान'वर काम सुरु करणार आहे, असं प्रशांत म्हणाले.

कमाई किती?

'हनु मान' चित्रपटाने पहिल्या दिवशी तेलगुमध्ये 5.89 कोटी रुपये कमवले. एकूण कमाई 8.05 कोटी इतकी झाली. हिंदी व्हर्जनमधील चित्रपटाने 2.1 कोटींची कमाई केली. या चित्रपटाची कथा आणि व्हिएफएक्स उत्तम असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. पहिल्याच शनिवारी या चित्रपटासाठीची मागणी 55.65 टक्क्यांनी वाढली.