मुंबई : काही अभिनेत्री या त्यांच्या कलागुणांसोबतच त्यांच्या कलाविश्वातील उपस्थितीसाठीही ओळखल्या जातात. एक अभिनेत्री असण्यासोबतच समाजातील जबाबदार घटक म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिका कायमच इतरांसाठी आदर्श प्रस्थापित करतात. अशाच एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीची चर्चा गेल्या काही वर्षांपासून चित्रपट वर्तुळात सुरु आहे.
मुळात ती अभिनेत्री दाक्षिणात्य असली तरीही, तिची चर्चा मात्र सर्वभाषीय प्रेक्षकांमध्ये असते. ती अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी sai pallavi. साईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती सोशल मीडियावर चक्क ट्रेंडमध्ये होती.
'प्रेमम' या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या साई पल्लवीच्या अभिनयाचे जितके चाहते आहेत तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त चाहते तिच्या नृत्यकौशल्याचे आहेत. साई पल्लवीने कायमच तिच्या आवडीच्या आणि कुठेही अतिशयोक्ती न होणाऱ्या भूमिकांना न्याय दिला आहे. बरं, रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या या अभिनेत्रीची स्वत:ची अशी काही तत्वं आहेत.
नैसर्गिक सौंदर्यालाच प्राधान्य देणारी साई, ही कमीत कमी मेकअपला पसंती देते. कित्येकदा तर ती मेकअप शिवायच चित्रपटांमध्ये झळकते. याचंच उदाहरण म्हणजे तिने नाकारलेली एका फेअरनेस क्रीमची जाहिरात. जवळपास दोन कोटी रुपयांची ही जाहिरात तिने आपल्या तत्वांखातर नाकारली. मुळात आपली त्वचा आणि रंगाचा पोत आहे तसाच सादर करण्याला तिने आधीपासूनच प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे ही जाहिरात नाकारणं तिच्यासाठी फारसं कठीण नव्हतं.
याचविषयी सांगताना ती म्हणाली होती, 'मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांचं समर्थन करत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगलाच पाहिजे'. अतिशय ठामपणे आपलं मत मांडणाऱ्या साईचा हाच स्वभाव चाहत्यांना भावतो.
दाक्षिणात्य चित्रपट विश्वात साई पल्लवी हे नाव नवं नाही. २०१५ मध्ये 'प्रेमम' या मल्याळम चित्रपटातून तिने अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. पुढे 'अथिरन', 'मारी २' या चित्रपटांनीही तिच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी दिली होती.