मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाच्या नावावरून सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव हेतूतः 'लक्ष्मी बॉम्ब' असे ठेवले आहे. त्यामुळे 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंसने खुलासा केला आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.
एका मुलाखतीत राघव लॉरेंसने चित्रपटाच्या नावाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तामिळ चित्रपटातील मुख्य भूमिका बजावणाऱ्या 'कंचना' नावावरून हिंदी रिमेकचं नाव 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवण्यात आलं आहे. कंचनाचा अर्थ सोनं असा होतो, जे लक्ष्मीचे प्रतिक आहे.
सुरवातीला हिंदी रिमेकचं नाव देखील कंचना ठेवण्यात आलं होतं मात्र सर्वांच्या निर्णयानंतर चित्रपटाने नाव 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवण्यात आलं असल्याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंसने केला आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारत आहे. त्याच्यातील भूत तृतीय पंथीय असल्याचे भासते. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.