सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : बऱ्याच वर्षांपूर्वी शालेय अभ्यासक्रमात हिरकणीची ही साहसगाथा डोळ्यांसमोर उभी राहिली होती. ती वाचत असताना काही चित्रच जणू मनात घर करुन गेली होती. घरात ठेवलेल्या तान्हुल्यासाठी हिरकणी जीव धोक्यात घालून कडा उतरली. किंबहुना हिरकणीचं कोणतंही छायाचित्र जरी उपलब्ध नसलं तरीही ती माय नेमकी कशी असेल याची आकृती प्रत्येकाच्याच मनात उमटली होती. ही मनातली एक अविस्मरणीय गाथा रुपेरी पडद्यावर जीवंत करण्याचा मानस उराशी बाळगत दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी त्यांच्या कलाकार मित्रांच्या साथीने एक कलाकृती सादर केली, ती म्हणजे ‘हिरकणी’....
प्रत्येक आई असतेच हिरकणी... असं म्हणत पुस्तकाच्या पानांमध्ये दडलेली ही साहसी आई प्रसाद ओक यांनी मोठ्या पडद्यावर आणली. चित्रपटांची सुरुवात, मुळात तो काळ साकारण्यासाठी घेतलेली मेहनत चित्रपट पाहताना लक्षात येते. पण काही गोष्टी मात्र खटकतात हे नाकारता येणार नाही. प्रेक्षकांना अपेक्षित असणारी हिरकणी सोनाली कुलकर्णीच्या रुपात समोर येते, तिच्या चेहऱ्यावर असणारा सालसपणा, भोळाभाबडा स्वभाव आणि कधीही न संपणारी सर्वांप्रतीच असणारी तिची माया मन जिंकून जाते. ‘जीवा’ साकारणारा अभिनेता अमित खेडेकर या साऱ्यामध्ये तिची सुरेख साथ देत आहे. तो म्हणजे महाराजांचा मर्द मराठा मावळा नेमका कसा होता याचं उदाहरणच जणू.
जीवा आणि हिरा (हिरकणी)चा संसार बहरतो, तोच या स्वराज्याच्या संस्कारांखाली. तोफेच्या आवाजाने दचकणारं हिरकणीचं बाळ याच तोफेच्या आवाजाशी इतकं एकरुप होतं की जणू त्याला खुद्द स्वराज्याच्या राणीसाहेबांनी दिलेला कानमंत्र आणि ‘शिलेदार’ हे शब्द उमगलेच असावेत. इतिहासातील एका प्रसंगाची साथ घेत तो साकारत असताना शिवाजी महाराजांचीही झलक पाहायला मिळते. मुळात त्याविषयी दिग्दर्शकाने कमालीची उत्सुकता ताणून धरली आहे. तेव्हा आता शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची जबाबदारी कोणी पेलली आहे हे तुम्हाला चित्रपटगृहातच कळेल.
असो.... तर, हिरा आणि जीवा यांच्या संसारात एका बाळाच्या येण्याने नांदत असणारं सुख, आनंद द्विगुणित होतं. पुढे जीवा बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनीच मोहिमेवरही जातो. तर, हिरकणी गडावर दूध पोहोचवण्याचा तिचा दिनक्रम सुरू ठेवते. चित्रपटाची कथा मुळात प्रेक्षकांना ठाऊक आहे. अर्थात काही पानांना चित्रपटात साकारण्यासाठी कलात्मक गोष्टींची जोड पाहायला मिळते. या साऱ्यात अर्थातच बरेच बारकावे टीपल्याचं पाहता येतं. मग ते कडा उतरणाऱ्या हिकरणीच्या जखमा असो, तिच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे हतबलतेचे भाव असो किंवा अनपेक्षितपणे तिच्याच आलेलं साहस असो.
इतक्या गोष्टी असतानाच ज्या थरारासाठी या चित्रपटाप्रती उत्सुकता ताणलेली होती, तो थरारच कमी वेळासाठी असल्यामुळे हिरमोड होतो. कडा उतरणाऱ्या हिकरणीच्या प्रत्येक पावलापावलावर प्रेक्षकांचं काळीजही धडधडू लागतं. भीतीने नव्हे, तर तिच्या दुखापतींमुळे. ही दृश्य, तो थरार आणखी काही वेळासाठी रंगवता आली असती असाच सुर आळवला जातो.
पूर्वार्धात जी कथा संतुलित वेगाने प्रेक्षकांना खिळवून ठेवते तिच कथा उत्तरार्धात मात्र हलकासा जास्त वेग धरते आणि चित्रपट अखेरीसही पोहोचतो. कलाकारांचा अभिनय प्रशंसनीय आहे. ऐतिहासिक कालखंड उभा करणं हे आव्हानच. पण, ते पेलण्याच्या साहसासाठीच प्रसाद ओकची आणि त्याला या चित्रपटात साथ देणाऱ्या प्रत्येकाची प्रशंसा करावी तितकी कमीच. पण, हिरकणी आणि तिच्या साहसाची, त्या थराराची आणखी काही क्षणांसाठी साथ असती तर..... असं राहून राहून वाटतं.
चित्रपटाच्या संगीत, वेशभूषा, संवाद आणि पार्श्वसंगीताविषयी सांगावं तर, त्या काळातील भाषेवर कलाकारांची चांगली पकड आहे. तर, पार्श्वसंगीतही या थराराला आणखी प्रभावी करत आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्वरातील गीत हे चार चाँद लावत आहे. एकंदरच काय, तर हिरकणीची ही गाथा एकदा पाहावी अशी आहे, पण असं करताना अपेक्षांचं ओझं सोबत घेऊन न जाता त्या आईच्या साहसाला सलाम करण्यासाठी म्हणून नक्की जा.