नवी दिल्ली : बॉलिवूड सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजाविरोधात गाझियाबाद कोर्टात अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीने रेमोवर पाच कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी गाजियाबाद कोर्टाने न्यायालयात सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्यानंतर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
हे प्रकरण २०१६ सालातील असल्याचं बोललं जात आहे. रेमोविरोधात गाझियाबादमधील सिहानी गेट ठाण्यात सत्येंद्र त्यागी यांनी गुन्हा दाखल केला. सत्येंद्र त्यागी यांनी, रेमोने 'अमर मस्ट डाय' नावाचा चित्रपट बनवण्यासाठी २०१६ मध्ये ५ कोटी रुपये घेतले होते. यावेळी रेमोने ५ कोटींवर १० कोटी मिळण्याचंही सांगितलं असल्याचं ते म्हणाले. तीन वर्षांनंतर त्यांना अद्याप मुद्दल किंवा त्यावरील कोणताही नफा न मिळाल्याचं सत्येंद्र यांनी सांगितलं.
२०१६ मध्ये सत्येंद्र यांनी रेमोविरोधात खटला दाखल केला होता. त्यावर गाझियाबाद जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु होती. सुनावणीच्या तारखांवेळी रेमो डिसूझा गैरहजर राहिल्याने कोर्टाने अखेर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
कोरिओग्राफर रेमो डिसूझाने एबीसीडी आणि रेस ३ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. रेमोने रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये जज म्हणूनही भूमिका साकारली आहे.