मुंबई: अभिनेता अजय देवगनने #MeToo मोहीमेवर भाष्य करण्यास नकार दिला. जोपर्यंत दिग्गज व्यक्तींवर झालेले आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मत मांडणे योग्य राहणार नाही, असे वक्तव्य अजयने केले. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अजयने सांगितले, #MeToo मोहिमेंतर्गत अनेक दिग्गज लोकांवर आरोप करण्यात आले. पण मी कोणाचेही समर्थन करणार नाही. या नावांमध्ये अशा काही व्यक्तींचा समावेश असेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. जोपर्यंत सत्याचा उलघडा होत नाही तोपर्यंत या विषयावर भाष्य करणे चुकीचे आहे. माझ्या मते सर्व आरोपांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
आता बॉलिवूडमध्ये ताकदीचा खेळ चालत नाही, महिला होणाऱ्या अत्याचारावर आवाज उचलण्यासाठी सक्षम झाल्या आहेत. नवीन पिढीमध्ये होणाऱ्या अत्याचारावर वाचा फोडण्याची हिंमत आहे आणि भविष्यासाठी हे फार गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हल्ली प्रसार माध्यमांपासून काहीही लपून राहू शकत नाही. आता प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता आली आहे, असंही यावेळी अजयने म्हटले.
अजय देवगनसोबतच बॉलिवूडच्या अन्य ताऱ्यांनी #MeToo मोहिमेचे समर्थन केले आहे. सध्या अजय देवगन त्याच्या 'टोटल धमाल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 22 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतात #MeToo मोहीम नावारुपास आणली. भारतात परतल्यानंतर तनुश्रीने तिच्यावर झालेल्या अन्यायाला #MeToo मोहिमेंतर्गत वाचा फोडली. मूळ अमेरीकेत उदय झालेल्या #METoo चे वादळ अद्यापही शमलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावे यात सामील आहेत. आलोकनाथ, अनू मलिक, विकास बहल, साजिद खान, रजत कपूर, राजू हिरानी, कैलाश खैर, सुभाष घई त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळातील अनेक नेतेमंडळीही आरोपांच्या जाळ्यात अडकले होते.