Abhishek Bachchan Says I Want To Talk : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. त्याचं कारण म्हणजे ऐश्वर्या आहे. ऐश्वर्यासोबत त्याच्या घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यासगळ्यात आता त्यानं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. खरंतर त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव 'आय वॉन्ट टू टॉक' आहे. त्याच्या या पोस्टरनंतर सगळीकडे विविध चर्चा रंगली आहे.
अभिषेक बच्चननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं 'आय वॉन्ट टू टॉक' असं लिहिलं आहे. यात अभिषेकचा चेहरा किंवा पोस्टर वगैरे दाखवलेलं नाही. सुरुवातीला 'आय वॉन्ट टू टॉक' असं लिहिलं आहे त्यानंतर एक गाडी चालू असल्याचं दिसतं तर त्याच्या डेकवर स्टॅच्यू ठेवलेला आहे. ज्याची मान सतत हलते. यात बॅगग्राऊंडला अभिषेकचा व्हॉईस ओव्हर येतो आणि यात तो त्याच्या भूमिकेसंबंधीत मजेशीर गोष्ट सांगताना दिसतो. या टीझरमध्ये अभिषेक बोलताना दिसतो की मला फक्त बोलायला आवडत नाही तर मी बोलण्यासाठी जगतो. कारण मला वाटतं की जिवंत असलेल्या लोकांमध्ये आणि मेलेल्या लोकांमध्ये फक्त इतका फरक आहे की जिवंत लोकं बोलू शकतात आणि मेलेले लोक बोलू शकत नाही. त्यानंतर टीझरच्या शेवटी चित्रपटाचं टायटल दिसलं.
चित्रपटाच्या पटकथेविषयी बोलायचं झालं तर त्यावरून असा अंदाज बांधण्यात येत आहे की त्यात रोजच्या आयुष्यातील वेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. टीझरमध्ये ऐकण्यात येत असलेला व्हॉईसओव्हर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. तर काही नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत उत्सुकतेनं प्रतिक्षा करत असल्याचं सांगत आहेत. तर काही नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत.
हेही वाचा : KBC 16 मध्ये 25,00,000 साठी विचारण्यात आला 'महाभारता'वर आधारीत प्रश्न; तुम्हाला माहितीये का उत्तर?
शूजित सरकारनं 'आय वॉन्ट टू टॉक' चं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात अभिषेक बच्चन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय त्यात अहिल्या बामरू, जॉनी लीवर, जयंत कृपलानी, पियरले डे आणि क्रिस्टिन गोडार्डसारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत. हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.