'शिष्टमंडळात एक तरी महिला प्रतिनिधी हवी होती'

दिग्दर्शिकेने व्यक्त केली खंत 

Updated: Dec 20, 2018, 12:22 PM IST
'शिष्टमंडळात एक तरी महिला प्रतिनिधी हवी होती'

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकदिवसीय मुंबई-पुणे दौऱ्यादरम्यान बॉलिवूड कलाकारांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर यांची उपस्थिती होती. त्याशिवाय 'प्रोड्यूसर्स गिल्ड असोसिएशन'च्या अध्यक्षपदी असणाऱ्या सिद्धार्थ रॉय कपूर आणि सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षपदी असणाऱ्या प्रसून जोशी यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

मनोरंजन उद्योगाकरता जीएसटी दरांमध्ये कपात करुन सर्व दर हे एकसारखेच ठेवण्याची मागणी या कलाकार आणि पंतप्रधानांमध्ये झालेल्या या बैठकीत करण्यात आली. 

ज्यानंतर खुद्द मोदींनीही या कलाकार मंडळींची भेट घेण्याचा आनंद व्यक्त केला. सोबतच या चर्चेत कोणत्या मुद्द्यांवर विचारांची अदलाबदल झाली याविषयीसुद्धा त्यांची थोडक्यात माहिती दिली. ज्यानंतर लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव हिने ट्विट करत सर्वांचच लक्ष वेधलं. 'या शिष्टमंडळात एखाची महिला प्रतिनिधी असती तर बरं झालं असतं. आपण २०१८ मध्ये आहोत... ', असं तिने ट्विटमध्ये लिहिलं. 

एकिकडे स्त्री-पुरूष समानतेच्या विषयांना अधोरेखित करत चित्रपटांच्या विषयांना हाताळणारं कलाविश्व आणि दुसरीकडे पंतप्रनांची भेट घेताना त्यामध्ये मात्र एकाही महिलेचा सहभाग नसणं ही बाब मात्र सध्या अनेकांच्याच नजरेत येत आहे. त्यामुळे पुन्हा एकता समान हक्कांच्या मुद्द्याला चालना मिळाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.