Jackie Shroff Property: अपना भिडू म्हणजे जॅकी श्रॉफ यांचे मुंबईसोबत खूप जवळचे नाते आहे. अलीकडेच जॅकी श्रॉफ यांनी एक वक्तव्य केले आहे ते खूप चर्चेत आहे. मी ती एक चूक केली नसती तर मी अर्ध्या अंधेरीचा मालक असतो, असं जॅकी यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पण ते असं का म्हणाले? हे जाणून घेऊयात.
जॅकी श्रॉफ त्यांची मुलं टायगर आणि कृष्णा श्रॉफ यांच्या खूप जवळ आहेत. टायगर आणि जॅकी श्रॉफ यांनी एकमेकांसोबत कामदेखील केलंय. त्याचबरोबर कॉफी विथ करणमध्येही त्यांनी हजेरी लावली होती. या वर्षात कॉफी विथ करणच्या आठव्या हंगामात जॅकी श्रॉफ मुलगी कृष्णासोबत दिसणार आहेत. दोघांनी एका फॅशन मॅगझीनमध्ये फोटोशूटदेखील केले आहे आणि एकमेकांबाबत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एका चुकीबाबतही सांगितले आहे.
जीक्यू इंडियासोबत त्यांनी एका मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या आवडीच्या वस्तुंवर सर्वात जास्त पैसे कोण खर्च करते. तेव्हा जॅकी श्रॉफ यांनी उत्तर दिलं होतं की मीच सर्वात जास्त पैसे खर्च करतो. तेव्हा त्यांनी खुलासादेखील केला की, पूर्वी मी असा नव्हतो.
जॅकी श्रॉफ यांना आता एका गोष्टीचा पश्चात्ताप होतोय. त्यांनी सुरुवातीला लग्झरी कारमध्ये पैसे लावले होते. तर मी असं केलं नसतं तर अर्ध्या अंधेरीचे ते आता मालक असते. खरं तर त्यांचे म्हणणे आहे की, जर त्यांनी कार घेण्यात जास्त गुंतवणूक न करता प्रॉपर्टीमध्ये केली असती तर आज त्यांच्याकडे खूप जास्त प्रॉपर्टी असती. त्यामुळं ते आजही मुलांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
जॅकी श्रॉफ यांनी मुलाखतीत त्यांच्या मुलीबद्दलही भाष्य केलं आहे. त्यांनी मुलाखतीत त्यांच्या मुलीलाच थेट विचारलं की तु तुझे पैसे कसे व कुठे गुंतवणूक करते. तेव्हा तिने म्हटलं की ती खूप चांगल्या पद्धतीने पैसे मॅनेज करते. त्यावर जॅकी यांनी म्हटलं की ती खूप जास्त कंजूस आहे.
कृष्णाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अद्याप चित्रपटात पाऊल ठेवलं नाहीये. मात्र ती देखील तिच्या भावासारखीच फिटनेस फ्रिक आहे. ती पोडकास्टदेखील होस्ट करते. तर, कृष्णा साउथ एशियाचे प्रमुख एमएमए मॅट्रिक्स फाइट नाइटची को-ऑनरदेखील आहे.