Bela Bose Demise : 'जय संतोषी मां' फेम अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Bela Bose Demise : अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिल्यानंतर अनेक नवोदित कलाकार आणि प्रामुख्यानं अभिनय कलेप्रती निष्ठा असणाऱ्या कलाकारांपुढे त्यांनी आदर्श प्रस्थापित केला होता... 

Updated: Feb 21, 2023, 08:56 AM IST
Bela Bose Demise : 'जय संतोषी मां' फेम अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप  title=
Jai Santoshi maa fame Actress bela bose died at the age of 79

Bela Bose Demise : ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यकलेत पारंगत असणाऱ्या अभिनेत्री बेला बोस यांच्या निधानं संपूर्ण कलाजगत हळहळलं. 20 फेब्रुवारीला बेला बोस यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनय क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या बेला बोस यांच्या जाण्यानं अनेक कलाकांनी दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

भलीमोठी कारकिर्द आणि कलेप्रती असणारी समर्पकता... 

1950 ते 1980 या कालावधीत बेला यांनी साधारण 200 हून अधिक हिंदी आणि स्थानिक भारतीय चित्रपटांमध्ये काम केलं. 'शिकार', जीने की राह आणि जय संतोषी मां हे चित्रपट त्यांना भलतीच लोकप्रियता देऊन गेले. बेला बोस या कलेप्रती असणाऱ्या त्यांच्या समर्पक वृत्तीमुळं ओळखल्या जात होत्या. अभिनयासोबतच त्या नृत्यकलेतही पारंगत होत्या. असं म्हणतात की रंगमंच म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं. इथं आल्यावर त्या वेगळ्याच दुनियेत हरपून जात होत्या. मणिपुरी शास्त्रीय नृत्य प्रकारात त्या निपुण होत्या. 

नशिबाचा फेरा कुणालाच चुकला नाही... बेलाही अपवाद नव्हत्या 

कोलकाता येथे एक कापड उद्योजक आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबात बेला यांचं जन्म झाला होता. त्यांच्या आयुष्यात हलाखीचे दिवस तेव्हा आले जेव्हा एकाएकी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. पण, इथं आल्यानंतर काही दिवसांतच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. वडिलांचा आधार गमावल्यानंतर बेला यांनी चित्रपटांमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली. सोबतच त्यांनी शिक्षणही सुरु ठेवलं. 

हेसुद्धा पाहा : Akshay Kumar च्या बॉडीगार्डनं चाहत्याला धक्का देताच... Video पाहून तुम्हाला बसेल धक्का

 

वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं. गुरु दत्त यांच्यासोबत त्या पहिल्यांदाच 'सौतेला भाई' या चित्रपटात झळकल्या. बंगाली नाटकांमध्येसुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. नशिबानं चांगले- वाईट असे सर्वच दिवस बेला यांना दाखवले. पण, वाईट परिस्थितीत त्या कधीच खचल्या नाहीत आणि चांगल्या परिस्थितीचा त्यांनी गर्व केला नाही.