छगन भुजबळ भाजपच्या 'माधव' समीकरणात फिट बसणारे?

BJP Madhav Equation: छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर आता भुजबळ कोणता राजकीय पर्याय स्वीकारणार याची चर्चा सुरु झाली. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 23, 2024, 08:35 PM IST
छगन भुजबळ भाजपच्या 'माधव' समीकरणात फिट बसणारे? title=
छगन भुजबळ

BJP Madhav Equation: छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक दिसतायत. भाजपच्या मनात भुजबळांविषयी काय आहे हे अजून नेमकं कळालेलं नाही. भुजबळांना भाजपनं त्यांच्यापासून दूरही ठेवलेलं नाही आणि जवळही केलेलं नाही. भुजबळ हे भाजपच्या 'माधव' समीकरणात फिट बसणारे आहेत का याचीची चाचपणी केली जातेय.

छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर आता भुजबळ कोणता राजकीय पर्याय स्वीकारणार याची चर्चा सुरु झाली. छगन भुजबळांना आता भाजप सर्वात जवळचा पक्ष वाटू लागलाय. जसं भुजबळांचं भाजपप्रेम उफाळून आलंय. तसं भाजपमध्येही ममत्व भावना दिसून येऊ लागलीय. भुजबळांसारखा नेता आपल्या बाजुनं असावा असं फडणवीस जाहीरपणे सांगू लागलेत.

भाजपला भुजबळ जवळचे वाटू लागले तरी भाजपच्या माधव पॅटर्नमध्ये भुजबळांची उपयुक्तता किती असा प्रश्नही निर्माण झालाय. 'मा' म्हणजे माळी, 'ध' म्हणजे धनगर आणि 'व' म्हणजे वंजारी.  
या पॅटर्ननुसार वंजारी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पंकजा मुंडे मंत्रिमंडळात आहेत. तर धनगर समाजाचे राम शिंदे विधान परिषदेचे सभापती आहेत. भाजपनं मंत्रिमंडळात माळी समाजाला प्रतिनिधीत्व दिलंय. संभाजीनगरचे अतुल सावे आणि साताऱ्याच्या जयकुमार गोरेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. पण महाराष्ट्रात माळी समाजातचा नेता अशी ओळख या नेत्यांना निर्माण करता आलेली नाही. त्यातूनच भुजबळांसारखा नेता पक्षात असावा असं भाजपला वाटत असावं. त्यामुळंच भुजबळांच्या बंडाबाबत भाजप नेत्यांना ममत्व दिसून येतंय.

भुजबळांना पुढच्या काळात प्रवेश दिलाही जाऊ शकतो. पण त्याआधी भाजपश्रेष्ठी अजित पवारांच्या मनाचा धांडोळा घेतल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत छगन भुजबळांना मोठा अस्वस्थतेचा काळ धीर धरुन काढावा लागणार आहे.

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? 

मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत हे जगजाहीर झालंय. आपल्या नाराजीबाबत छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांशी बोलणं अपेक्षित होतं. पण अजून ना भुजबळांनी संपर्क साधलाय ना अजित पवारांनी. दुसरीकडं भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भुजबळांच्या नाराजीची दखल अजित पवार घेत नसताना देवेंद्र फडणवीस मात्र भुजबळांसोबत बैठका करतायेत. फडणवीस आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांची अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. भुजबळांनी पुढच्या आठ ते दहा दिवसांत ठोस निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय.राष्ट्रवादीत थांबण्याच्या मानसिकतेत भुजबळ दिसत नाहीयेत.  छगन भुजबळांनी परतीचे दोर कापलेत याचे स्पष्ट संकेत दिलेत. राष्ट्रवादीत थांबण्याच्या मानसिकतेत भुजबळ दिसत नाहीयेत.  छगन भुजबळांनी परतीचे दोर कापलेत याचे स्पष्ट संकेत दिलेत.अजित पवारांनीही भुजबळांच्या नाराजीवर काहीच भाष्य केलेलं नाही. भुजबळ हा पक्षांतर्गत विषय असून त्यावर एकत्र बसून तोडगा काढू असं अजित पवार म्हणालेत. भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता. पण तो निर्णय भुजबळांना मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. छगन भुजबळांसोबत झालेल्या बैठकीत भाजपमध्ये येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. भुजबळांच्या नाराजीवर महायुतीचे तीनही नेते बसून तोडगा काढतील असं फडणवीसांनी सांगितलंय. छगन भुजबळ यांच्या नाराजीकडं राष्ट्रवादी दुर्लक्ष करीत असली तरी भाजप मात्र भुजबळांकडं दुर्लक्ष करत नाहीये. त्यामुळं नाराज भुजबळ हाती कमळ घेणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.