Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीत नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडून समजूत काढण्यात आलेली नाही. छगन भुजबळांचं राजकीय वजन कमी झालंय की काय अशी परिस्थिती असताना भुजबळांनी आता भाजपशी सलगी करायला सुरुवात केलीय.
मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत हे जगजाहीर झालंय. आपल्या नाराजीबाबत छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांशी बोलणं अपेक्षित होतं. पण अजून ना भुजबळांनी संपर्क साधलाय ना अजित पवारांनी. दुसरीकडं भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भुजबळांच्या नाराजीची दखल अजित पवार घेत नसताना देवेंद्र फडणवीस मात्र भुजबळांसोबत बैठका करतायेत. फडणवीस आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांची अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. भुजबळांनी पुढच्या आठ ते दहा दिवसांत ठोस निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय.
राष्ट्रवादीत थांबण्याच्या मानसिकतेत भुजबळ दिसत नाहीयेत. छगन भुजबळांनी परतीचे दोर कापलेत याचे स्पष्ट संकेत दिलेत. राष्ट्रवादीत थांबण्याच्या मानसिकतेत भुजबळ दिसत नाहीयेत. छगन भुजबळांनी परतीचे दोर कापलेत याचे स्पष्ट संकेत दिलेत.अजित पवारांनीही भुजबळांच्या नाराजीवर काहीच भाष्य केलेलं नाही. भुजबळ हा पक्षांतर्गत विषय असून त्यावर एकत्र बसून तोडगा काढू असं अजित पवार म्हणालेत.
भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता. पण तो निर्णय भुजबळांना मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. छगन भुजबळांसोबत झालेल्या बैठकीत भाजपमध्ये येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. भुजबळांच्या नाराजीवर महायुतीचे तीनही नेते बसून तोडगा काढतील असं फडणवीसांनी सांगितलंय. छगन भुजबळ यांच्या नाराजीकडं राष्ट्रवादी दुर्लक्ष करीत असली तरी भाजप मात्र भुजबळांकडं दुर्लक्ष करत नाहीये. त्यामुळं नाराज भुजबळ हाती कमळ घेणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.