एक पुरुष आणि सात महिलांची भन्नाट केमेस्ट्री असणाऱ्या झिम्मा सिनेमाचा टीझर रिलीज

जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या सिनेमाचा टीझर रिलीज

Updated: Mar 8, 2021, 01:45 PM IST
एक पुरुष आणि सात महिलांची भन्नाट केमेस्ट्री असणाऱ्या झिम्मा सिनेमाचा टीझर रिलीज

मुंबई : सोनाली कुलकर्णी, मृणाल गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर अशी बडी स्टारकास्ट असलेला झिम्मा सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. लॉकडाऊनंतर पहिला मोठा सिनेमा बॉक्स ऑफिसवर येण्यासाठी सज्ज झालाय. मुख्य म्हणजे सात बायका आणि एक पुरुष असलेला हा सिनेमा येत्या 23 एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे

या सिनेमातील टीझर वरुन या सिनेमात सात महिलांची भन्नाट केमेस्ट्री पहायला मिळणार आहे. विविध क्षेत्रातील महिला एकत्र येऊन फिरायला जायचा प्लान करतात. तिथे गेल्यावर त्यांची ओळख होते आणि त्यानंतर ती मैत्रीत कशी रुपांतर होते हे या सिनेमाच्या टीझर वरुन सिनेमात पाहायला मिळेल असं दिसतंय. अनेक वेळा घर, नोकरी, मुला-बाळांचं शिक्षण, संसार  असं सगळं सांभाळत महिला आपलं आयुष्य पणाला लावतात. मात्र या सगळ्या गडबडीत स्वत:वर दुर्लक्ष करणाऱ्या महिला मनात असलेल्या शंका कशा व्यक्त करतात? इंग्लंडला जायचा प्लान कसा करतात? तिथे गल्यावर त्या सात महिला फ्रिडम कसं एन्जॉय करतात. अशा महिलांच्या विविध भावना या टिझरमधून मांडण्यात आल्या आहेत.

याआधी हेमंत ढोमच्या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तसा संदेश देखील दिला आहे. या सिनेमाच्या टिझरवरुन हा सिनेमा महिलांच्या आयुष्यावर आधारीत आहे असं दिसतंय. बडी स्टारकास्ट असलेला झिम्मा सिनेमाचं हेमंत ढोमेनं दिग्दर्शन केलं असून, क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ,विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या टीझरवरुन हा सिनेमा कौटुंबिक मनोरंजन करणारा असेल. हा सिनेमा २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

पाहा सिनेमाचा टीझर