मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यापुढे उभ्या राहिलेल्या अडचणींमध्ये आणखी वाढ होताना दिसत आहे. ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समोर येत आहे. अभिनेता आदित्य पांचोलीसोबत असलेला तिचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई न्यायालयाने अब्रूनुकसानीच्या आरोपाखाली कंगणा आणि बहिण रंगोली चंदेल हिला समन्स जारी केले आहे.
A Mumbai court has issued summons to actress Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel in a defamation case filed by Aditya Pancholi in 2017. The next date of hearing is July 26. #Maharashtra
— ANI (@ANI) June 25, 2019
दोघी बहिणींना चार समन्स जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आदित्य पांचोली विरूद्ध कंगना रानौत, आदित्य पांचोली विरूद्ध रंगोली चंदेल, झरीना वाहाब विरूद्ध कंगना रानौत आणि झरीना वाहाब विरूद्ध रंगोली चंदेल अशा चार समन्सचा समावेश असल्याची माहिती आदित्यचे वकील श्रेया श्रीवास्तव यांनी दिली आहे.
सदर प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे. ज्यावेळी कंगणाने न्यायालयात हजर राहणे अपेक्षित आहे. या प्रकरणामध्ये आदित्य पांचोलीची पत्नी झरीनाने आपल्या पतीचे समर्थन केले आहे. 'मी त्यांना इतरांपेक्षा जास्त ओळखते. माझ्या पासून ते कोणतीही गोष्ट लपवत नाहीत. भूतकाळात काय झालं ते मला माहित आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केले नाही', असे ती म्हणाली.
कंगनाने आदित्य पांचोलीवर शारीरिक हिंसा आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर २०१७ मध्ये पांचोलीने कंगनाविरूद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. सुनावणी दरम्यान न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दोघांना समन्स जारी करण्यात आला होता. आदित्य पांचोलीने काही दिवसांपूर्वीच कंगनाविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. त्यामुळे येत्या काळाता चिघळलेला हा वाद कोणते नवे वळण घेणार हे पाहणे अतीव महत्त्वाचे ठरणार आहे.