कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' अशी ओळख असणारा अभिनेता दर्शनला (Darshan Thoogudeepa) अटक झाल्यानंतर खळबळ माजली आहे. यानंतर कन्नड चित्रपटसृष्टी यावर व्यक्त होत आहे. त्यातच प्रसिद्ध कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने याप्रकरणी न्याय मिळाला पाहिजे असं स्पष्ट मत मांडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अभिनेता दर्शन, पवित्रा यांच्यासह 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
दर्शन आणि पवित्रा सध्या इतर 11 आरोपींसह पोलीस कोठडीत आहेत. रेणुकास्वामी हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं आहे की, पीडितने अभिनेत्याची जवळची मैत्रीण, अभिनेत्री पवित्रा गौडाला आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. यामुळेच नाराज झालेल्या दर्शनने रेणुकास्वामीच्या हत्येची सुपारी दिली.
किचा सुदीपने याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. "न्याय आणि मैत्री या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. रेणुकास्वामीच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे, मग ते शहर कोणतेही असो," असं स्पष्ट मत त्याने मांडलं आहे. त्याची पत्नी आणि कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असंही तो म्हणाला आहे.
तपासात समोर आलं आहे की दर्शन आणि त्याच्या साथीदारांनी रेणुकास्वामीला बंगळुरूच्या कामाक्षीपल्य येथील एका शेडमध्ये नेले. तिथे दर्शन याने रेणुकास्वामीला पट्ट्याने बेदम मारहाण केली आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना लाठ्याने बेदम मारहाण केली.
हल्ल्यामुळे रेणुकास्वामीला अनेक फ्रॅक्चर आणि गंभीर जखमा झाल्या. एका फूड डिलिव्हरी बॉयला रेणुकास्वामीचा मृतदेह आढळला. भटके कुत्रे त्याच्या शरीराचा चावा घेत होते. शवविच्छेदन अहवालातून हत्या किती क्रूरपणे केली हे स्पष्ट होत आहे.
सोमवारी पोलिसांनी सांगितलं की, रेणुकास्वामीची हत्या करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे, धनराज केबल कर्मचारी आहे. धनराजने पोलिसांना सांगितलं आहे की, प्रकरणातील आणखी एक आरोप नंदीशने त्याला बंगळुरुमधील गोडाऊनमध्ये बोलावलं होतं. तिथे रेणुकास्वामीला शॉक देण्यासाठी एका डिव्हाइसचा वापर करण्यात आला. पोलिसांनी हे डिव्हाइसही जप्त केलं आहे.
दर्शनने हत्येचा गुन्हा आपल्या अंगावर घेण्यासाठी तिघांना पैशांची ऑफर दिली होती. पण चौकशीत ते उघड झालं. दर्शनने प्रत्येकाला 5 लाख देण्याचं अमिष दिलं होतं. या हत्या प्रकरणानंतर कर्नाटकात संताप व्यक्त होत असून, अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या आहेत.