अंगावर काटा आणणारी दृश्यं आणि 'दैवा'च्या जन्माची कहाणी; 'कांतारा 2'चा टीझर पाहून थरकाप उडेल

Kantara 2 first teaser Video : विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आणि ऋषभ शेट्टीनं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला.   

सायली पाटील | Updated: Nov 27, 2023, 03:36 PM IST
अंगावर काटा आणणारी दृश्यं आणि 'दैवा'च्या जन्माची कहाणी; 'कांतारा 2'चा टीझर पाहून थरकाप उडेल  title=
Kantara 2 first look Kannada actor Rishab Shetty shows birth of a legend in watch video

Kantara 2 first teaser Video : रुढी, परंपरा, समजुती आणि त्याला वास्तवाची जोड देणाऱ्या कथानकाला हात घालत 'कांतारा' हा चित्रपटच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मुळता कन्नड भाषेत असणारा हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता याच चित्रपटानं अनेकांना खडबडून जागं केलं.या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यानं अतिशय सच्चेपणानं सादर केलेली त्याची कला सर्वांच्या मनात कायमस्वरुपी घर करून गेली. 

हाच ऋषभ शेट्टी आता पुन्हा एकदा एका दमदार कथानकासह 'कांतारा' या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यास सज्ज झाला आहे. त्याच धर्तीवर नुकताच  Kantara 2 चा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कांतारा लेजंड- पहिला भाग' अशा ओळीसह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं या टीझरच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. 

रात्रीच्या अंधारात, घनदाट जंगलामध्ये हातात मशाल घेऊन पेटलेल्या रिंगणाच्या मधोमध उभ्या असणाऱ्या शिवाला कसलासा भास होतो आणि दैवाची आरोळी त्याच्या कानांवर पडते. नेमकं काय घडतंय याच भीतीनं शिवा अर्थात ऋषभ शेट्टी अवाक् होऊन पाहत राहतो आणि त्याच्यापुढं रक्तबंबाळ आकृती उभी राहते. 

शब्द कानी पडू लागतात, 'उजेड... सर्वजण उजेडात सर्वकाही पाहू शकतात. पण हा उजेड नाही, ही दृष्टी आहे. नेमकं काय घडलं, काह घडतंय आणि काय घडेल याची दृष्टी आहे. इथं सर्वकाही स्पष्ट दिसतंय... तुम्हाला दिसतंय का?'

हेसुद्धा वाचा : LIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या 

कांताराच्या दुसऱ्या भागामध्ये कथानक पुन्हा कर्नाटकातील कदंबा साम्राज्यात नेणार आहे. सोशल मीडियावर हा टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांनी तो वारंवार पाहिला. इतकंच नव्हे, तर चित्रपटासाठीची उत्सुकताही व्यक्त केली. हा चित्रपट पुन्हा एकदा भारतीय कलाकृतींना एक नवा दर्जा देणार आहे अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. हा चित्रपट येत्या काळात कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी या भाषांमध्ये झळकणार आहे.