कंगनाला अडचण होत असेल तर कलाविश्व सोडावं - करण जोहर

सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बॉलिवूडमधील घराणेशाहीला सतत विरोध करताना दिसत आहे.   

Updated: Jul 20, 2020, 03:02 PM IST
कंगनाला अडचण होत असेल तर कलाविश्व सोडावं - करण जोहर  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतला इंडस्ट्रीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तिने कलाविश्व सोडावं असं वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने एका मुलाखतीत केलं. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत सध्या सोशल मीडियावर चांगलीचं चर्चेत आहे. प्रत्येक विषयावर परखड मत व्यक्त करणारी कंगना कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. आता देखील अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियाच्यामाध्यमातून कंगना बॉलिवूडमधील घराणेशाहीला सतत विरोध करताना दिसत आहे. 

याप्रकरणी  दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. दरम्यान करण जोहरचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करण जोहरचा कंगनावर असलेला संताप स्पष्ट झळकत आहे. 

'कंगनाने प्रत्येकवेळी असं भासवलं आहे की तिच्यावर इंडस्ट्रीमध्ये कायम अन्याय होत आला आहे. असं असेल तर तिने खुशाल कलाविश्वाला रामराम ठोकावा. कोणीही तिला थांबवणार नाही.' असं वक्तव्य करण जोहरने केलं आहे. 

दरम्यान, सध्या सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये वादळ आलेलं आहे. १४ जुन रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. मात्र त्याच्या आत्महत्येमागील रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. याप्रकरणी आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.