Karan Mehra Allegations: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेता करण मेहरा यानं हल्लीच त्याची पत्नी, निशा रावल (Nisha Rawal) हिच्यावर काही गंभीर आरोप लावले आहेत. करणनं केलेले आरोप पाहता अनेकांसाठी ही बाब धक्कादायक ठरू शकते.
आपण हे नातं वाचवण्याचा नेहमीच प्रयत्न केला, पण पत्नी मात्र कोणा दुसऱ्यासोबतच राहत असल्यामुळे आता माझ्या बाजूनं मीच लढा देणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं.
आरोप करत करण काय म्हणाला?
मागील वर्षी करण मेहरा (Karan Mehra) आणि निशा रावल यांच्या नात्याची वेगळी बाजू अनेकांनाच धक्का देऊन गेली. करणनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप लावल निशा जखमी अवस्थेत माध्यमांसमोर आली, ज्यामुळं त्याला कारावासही भोगावा लागला.
आता मात्र या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. कारण, करणनं आपल्या वतीनं आपण लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधावर भाष्य करताना तो म्हणाला, 'मी सर्वकाही विसरुन निशाला पुन्हा घरी यायला सांगितलं. आम्ही या नात्याला दुसरी संधीही देण्याचा प्रयत्न केला. पण, आता कळतंय की माझ्या जाण्यानंतर 11 महिने परपुरुष माझ्या घरी राहिला आहे. बायका- मुलांना सोडून तो माझ्या घरी होता.'
पत्नी परपुरुषासोबत राहत असल्याचं सांगत , आपल्यापासून आपला मुलगा दुरावला; 20 वर्षांच्या कारकिर्दीची धुळधाण केली सांगत आता मात्र मी शांतपणे सर्व सहन करणार नाही, असं म्हणत करणनं या नात्यात लढण्याची तयारी दाखवली.
गेल्या वर्षभरापासून आपल्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून, आता आपली सहनशक्ती संपल्याचं सांगत निशाच्या तीन मित्रांविरोधातही अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यानं सांगितलं.
निशानं एका रिअॅलिटी शोमध्ये आपल्या विविहबाह्य प्रेमसंबंधांची घोषणा केली होती. ज्याच्यासोबत तिचं अफेअर होतं तो आपला चांगला मित्र असल्याचंही तिनं सांगितलं. करणलाही याची माहिती असल्याचं निशानं सांगितलं होतं.
तिथं हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या नात्याला दर दिवशी नवं वळण मिळत असतानाच आता इथे निशा आणि करणच्या नात्याला कोणती दिशा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.