केतकी चितळे ट्रोल, मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे निर्देश

अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Updated: Jun 19, 2019, 08:58 AM IST
केतकी चितळे ट्रोल, मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे निर्देश title=

मुंबई : 'तुझ माझं ब्रेक अप' फेम अभिनेत्री केतकी चितळेला काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांकडून अश्लील भाषेत ट्रोल करण्यात आले होते. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. डॉ.नीलम गोऱ्हे, सुशांत शेलार , दिगंबर नाईक यांच्या शिष्टमंडळास हे आश्वासन देण्यात आले आहे. 

संबंधित प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदनही सादर करण्यात आले. ज्या आधारे त्यांनी अशा खोट्या सोशल मीडिया अकाउंटवरून ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले. निवेदन सादर करण्यासाठीच्या या शिष्टमंडळात अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेता दिगंबर नाईक, सुशांत शेलार, प्रकाश वालावलकर हे उपस्थित होते.

ट्रोलर्सला प्रत्यूत्तर देताना केतकी म्हणतेय '...असा महाराष्ट्र माझा नाही'

मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ६७ आयटी नुसार कारवाई करण्यात येते. पण,  ६६(अ) कलम रद्द झाल्यामुळे कारवाई करण्यास काही समस्या येत आहेत. त्यामुळे शासनाने सदर प्रकरणात कठोर पाऊले उचलावीत. त्याचप्रमाणे आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.  

अधिक वाचा - ट्रोलर्सला प्रत्यूत्तर देताना केतकी म्हणतेय '...असा महाराष्ट्र माझा नाही' 

काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने मराठीतून नव्हे, तर हिंदीमधून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने हिंदी ही आपली 'राष्ट्रभाषा' आहे असे म्हटले होते. मात्र, केतकीच्या या व्हिडिओवर ट्रोलर्सकडून शेलक्या शब्दांत तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.