"पाटलीण हायेस... रुबाबात नाच, बिनधास्त नाच", Gautami Patil साठी किरण माने यांची खास पोस्ट

Gautami patil च्या आडनावावरून सुरु असलेल्या वादावर किरण माने यांनी पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दिला आहे. किरण माने यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याची पोस्ट ही चर्चेचा विषय ठरला असून त्यावर देखील नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

दिक्षा पाटील | Updated: May 27, 2023, 12:00 PM IST
"पाटलीण हायेस... रुबाबात नाच, बिनधास्त नाच", Gautami Patil साठी किरण माने यांची खास पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Gautami patil : सध्या महाराष्ट्राच्या तरुणाईला लावणी डान्सर अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलनं वेड लावलं आहे. गौतमीचे सतत कुठे ना कुठे कार्यक्रम सुरु असतात. गौतमी सध्या तिच्या आडनावाच्या वादावरून चर्चेत आहे. तिचे खरे आडनाव हे पाटील नाही तर चाबुकस्वार असे आहे असा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की पाटील हे आडनाव लावत गौतमी पाटलांची बदनामी करत आहे. त्यामुळे तिनं जर तिचं खरं आडनाव लावलं नाही तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं. अशात अनेकांनी गौतमीचा विरोध केला तर काही लोक गौतमीला पाठिंबा देत पुढे आहे. तिला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये मराठी अभिनेता किरण माने यांचं देखील नाव आहे. किरण माने यांनी गौतमीला पाठिंबा देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने म्हणाले की "...एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे... गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगितलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे, असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या 'स्वातंत्र्य' या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल. चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे... आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं... कसं वागायचं...  स्वत:च्या घरात काय खायचं... कसले कपडे घालायचे... यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच... पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनाव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आहे... धमक्या देत आहेत तर हे लै म्हणजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय."

हेही वाचा : "मी 60 वर्षांचा नाही तर...", दुसऱ्या लग्नाच्या चर्चांनंतर Ashish Vidyarthi यांचे अनेक मोठे खुलासे, पाहा Video

पुढे किरण माने म्हणाले की, "गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्‍यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस... पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्‍या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता 'बिभत्स' असं काहीही नाही. परफॉर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्‍या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे... पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही की, आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त 'क्रेझ' आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पॉप्यूलर आहेस. तू हे यश एंजॉय कर. बर्‍याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण 'आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस' असं दरडावू पाहाणार्‍यांना उंच उंच लांब उडवून लाव. आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली 'पाटलीण' हायेस... रुबाबात नाच, बिनधास्त नाच !