मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट अनेकांना अंगावर काटा आणणारी आहे. त्याचं कारण म्हणजे सिद्धार्थने त्याच्या घराजवळ आलेल्या बिबट्याचा एक व्हिडिओ शेअर केलाये. हा व्हिडिओ पोस्ट करताच तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
खरं तर, काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने अशीच एक पोस्ट शेअर केली होती. पण सतत सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांना इतक्या जवळून बिबट्याचं दर्शन होण्यामागचं कारण म्हणजे हे दोघेही संजय गांधी नॅशनल पार्कजवळ राहतात. त्यामुळे त्याच्या घराच्या जवळच त्यांना विविध प्राणी-पक्षी पाहायला मिळतात.
मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी चक्क बिबटच्याचं जवळून दर्शन घेतलं होतं. एवढंच नाही तर सिद्धार्थने त्या बिबट्याचा फोटोही क्लिक केला होता. आता पुन्हा एकदा त्या बिबट्याची झलक सिद्धार्थला पाहायला मिळालीय.
याआधी बिबट्याचा फोटो शेअर करत सिद्धार्थ "आता तो मित्र झालाय" असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.त्यानंतर गेल्या रात्री शूट केलेला व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थ लिहीतो की, "कोऱ्या. काल रात्री परत आला होता. त्याचं हे नाव पडलंय कोरम मॉल वरून. 2019 मध्ये ठाण्याच्या कोरम मॉल मध्ये हे साहेब शिरले होते.
पुढे सिद्धार्थ लिहितो, "त्याला तिकडून वाचवलं आणि एक ट्रॅकिंग चिप बसवून पुन्हा संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडून दिलं.त्याला वनविभाग वाले L-86 म्हणून ओळखतात. माझ्या घरामागे कायम येत असतो हा. आता मित्र झालाय. कोऱ्या. त्याच्यावर लाईट आम्ही मारत नव्हतो. आमच्याकडे अशी बॅटरी नाही. सांगून ठेवलं."
हा तोच बिबट्या आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी ठाण्याच्या कोरम मॉल येथे हजेरी लावली होती. ही माहिती स्वत: सिद्धार्थने या पोस्टमधून दिली आहे.सिद्धार्थ या बिबट्याला कोऱ्या नावाने संबोधतोय. वनविभागाने L-86 अशी ओळख त्याला दिली आहे.