मुंबई : हिंदी सिनेसृष्टीला नेहमीच मराठी सिनेमाची भूरळ पडते. यामधूनच काही जण मराठी सिनेमाच्या निर्मितीमध्ये येतात तर काही थेट मराठी कलाकारांनाच त्यांच्या तालमीमध्ये तयार करतात.
संजय लीला भंसाळी हे हिंदी सिनेसृष्टीतील अभ्यासू आणि मोठे दिग्दर्शक असले तरीही त्यांना मराठीची ओढ कायम आहे. यापूर्वी 'लाल इश्क' या मराठी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. पण आता थेट एका मराठी कलाकाराला त्यांनी दिग्दर्शनाची संधी दिली आहे. संजय लीला भंसाळी 'पद्मावती' चित्रपटानंतर त्यांची भाची शर्मिन सेहगलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी एका सिनेमाच्या शुटिंगची तयारी करत आहेत. याचित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मराठी लेखक- निर्माता मंगेश हाडवळे याची निवड करण्यात आली आहे.
मंगेश हाडवळे यांनी यापूर्वी 'टिंग्या, ‘देख इंडियन सर्कस’या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि 'टपाल' या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती केली आहे.मंगेश हाडवळे दिग्दर्शित आणि संजय लीला भंसाळी निर्मित आगामी सिनेमा म्युझिकल आहे. एका तरूण जोडप्याची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शर्मिनच्या पदार्पणासाठी हा चित्रपट परफेक्ट असल्याचे भंसाळींच्या टीमकडून सांगण्यात आले आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईल.