मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतचा सिनेमा 'मणिकर्णिका' लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाअगोदरच सर्वात धक्कादायक दुःखद अशी बातमी समोर आली आहे. या सिनेमाचे निर्माता कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मणिकर्णिका या सिनेमाला अगदी सुरूवातीपासूनच गालबोट लागलं आहे. सिनेमाच्या चित्रिकरणापासून हा सिनेमा वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत राहिला आणि आता ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.
कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की, रूग्णालयात दाखल होण्याची ही योग्य वेळ नाही हे मला माहित नाही. आशा करतो की, मी लवकरच रूग्णालयातून बाहेर येईन आणि कष्टाचा आनंद आपण लुटू. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असं म्हणतं त्यांनी ही गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली आहे.
कुणाला वाटलंच नव्हतं की त्यांची तब्बेत इतकी बिघडेल. कमल जैन यांची निर्मिती असलेला मणिकर्णिका हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. कंगनाचा हा सिनेमा अगदी सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. तसेच आता करणी सेनेने कंगनाला धमकी देखील दिली आहे. याला विरोध करत तिने प्रतिउत्तर दिलं आहे.
करणी सेनेचा वाद
राष्ट्रपतींनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन स्क्रीनिंगचे फोटो शेअर केले आहेत. पण करणी सेनने सिनेमाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. करणी सेनेचा लक्ष्मीबाई यांचे ब्रिटीश आधिकाऱ्यांसोबत दाखवलेल्या सीनला विरोध आहे. त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रीत केलेल्या गाण्याला विरोध केला आहे. गाण्यात राणी लक्ष्मीबाई यांना डान्स करताना दाखवल्यामुळे सिनेमाला प्रदर्शित करण्यास करणी सेना विरोध दर्शवत आहे. करणी सेनेने सिनेमाच्या निर्मात्यांना धमकी दिली आहे. सिनेमा आधी आम्हाला दाखवा नाही तर सिनेमाला हिंसक वळण लागेल.
करणी सेनेकडून होणाऱ्या विरोधाला कांगनाने चांगलेच प्रतीउत्तर दिले आहे. कंगणा म्हणाली, मी कोणाला घाबरत नाही. लढल्याशिवाय मी हिम्मत हारणार नाही. चार इतिहासकारांनी मणिकर्णिका सिनेमा पाहिला आहे. सेन्सर बोर्डाने सिनेमाला मान्यता दिली. करणी सेना मला सारखा त्रास देत आहे. त्यांना माहित आहे मी सुध्दा एक राजपूत आहे, आणि एक-एक करुन सगळ्यांना नष्ट करेल.