'बिनकामारा नवरा' सांगतोय रंजनासोबतच्या आठवणी

रंजना म्हणजे... जेव्हा अशोक सराफ रंजना यांच्याबद्दल भरभरून बोलतात 

Updated: Jul 1, 2022, 01:02 PM IST
'बिनकामारा नवरा' सांगतोय रंजनासोबतच्या आठवणी  title=
Marathi Actor Ashok saraf on working with late actress ranjana

मुंबई : विनोदाचा बेताज बादशहा, अशी ओळख असणारा एक मराठी अभिनेता म्हणजे अशोक सराफ. काही कलाकार समोर आले, तरी त्यांच्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो, त्यांच्या कामापुढं मान आदरानं झुकते. अशाच कलाकारांमधलं हे एक नाव. एक सेलिब्रिटी म्हणून अशोक सराफ जितके प्रसिद्ध तितकेच ते एक व्यक्ती म्हणूनही प्रत्येकालाच आपलेसे वाटतात. (Marathi Actor Ashok saraf on working with late actress ranjana)

बहुविध चित्रपटांमधून अशोकमामांनी तितक्याच तोडीच्या भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेला 'धनंजय माने' असो किंवा मग 'बिनकामाचा नवरा'मधला 'तुकाराम' असो. त्यांच्या कोणत्याही भूमिकेची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. 

अशोकमामांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत बऱ्याच अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली. एका अभिनेत्रीला तर त्यांनी आपली जोडीदार म्हणूनच निवडली. अर्थात अभिनेत्री निवेदिता यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. 

असं असलं, तरीही मोठ्या पडद्यावर मात्र त्यांची आणि अभिनेत्री रंजना यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. रंजना आणि अशोक सराफ ही जोडी आहे, म्हणजे चित्रपट सुपरहिट झालाच म्हणून समजा, असं त्यावेळी अनेकजण पैज लावून सांगत असत. 

रंजना आणि अशोक सराफ या दोघांच्याही विनोदाचं टायमिंग असो, किंवा मग एकमेकांच्या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत असो. सगळंच एकदम 'शॉल्लेट'. प्रेक्षकांनीही त्या दोघांना भरभरून प्रेम दिलं. 

हल्लीच एका मुलाखतीत सराफ यांनी आपली पत्नी कलाजगतात असतानाही रंजना अभिनेत्री म्हणून मला प्रचंड आवडतात असं स्पष्ट केलं. 

रंजना यांच्याबद्दल काय म्हणाले अशोक सराफ ? 
रंजना ज्यावेळी सिनेसृष्टीत आली, तेव्हा तिनं विनोदी भूमिका साकारल्या नव्हत्या. विनोदी भूमिकांची सुरुवात तिनं माझ्यापासूनच केली, असं सांगताना त्यावेळी आपल्याहून जास्त कौतुक रंजना यांच्या अभिनयाचंच झाल्याचं सराफ यांनी सांगितलं. 

विनोदाच्या बाबतीत सांगावं, तर रंजना अशोक सराफ यांच्या वरचढ असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. पण, या प्रतिक्रियाही त्यांना सुखावणाऱ्या होत्या. कारण, एक अभिनेत्री म्हणून रंजना उत्तम असल्याची बाब तेव्हापर्यंत खुद्द अशोक सराफांनीही स्वीकारली होती. 

भूमिका जमणार नाही, हे वाक्य रंजना यांच्यापासून फारच दूर असल्याचं सांगत त्यांच्यासारखी दुसरी अभिनेत्री होणे नाही असंही ते म्हणाले. 'रंजनासारखं दुसरं कुणीच नव्हतं. तिच्यानंतर आलेल्या बऱ्याच अभिनेत्रींसोबत मी काम केलं, पण रंजनासारखी रंजनाच होती', असं म्हणत त्यांनी या अभिनेत्रीच्या आठवणी जागवल्या. 

रंजना आणि अशोक सराफ या दोघांची जोडी रुपेरी पडद्यावर प्रसिद्ध होतीच, पण त्या काळात प्रत्यक्ष आयुष्यातही या दोन्ही कलाकारांच्या जोडीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. अर्थात पुढे काय घडलं याची सर्वांना कल्पना आहेच. रंजना हे जग सोडून गेल्या असल्या तरीही कलाकृतींच्या माध्यमातून त्या येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी हजर असतील असं म्हणणं वावगं ठरणार नाही.