गौरव मोरेला 'या' चित्रपटासाठी मिळाला पहिला पुरस्कार, खास व्यक्तींना केला समर्पित

गौरव मोरेच्या या पोस्टवर अनेक कलाकार लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

Updated: Feb 23, 2024, 11:39 PM IST
गौरव मोरेला 'या' चित्रपटासाठी मिळाला पहिला पुरस्कार, खास व्यक्तींना केला समर्पित title=

Gaurav More first Award Post : ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर गौरवने मोठ्या पडद्यावरही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता गौरवला चित्रपटसृष्टीतील पहिला पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्ताने त्याने पोस्ट शेअर केली आहे. 

गौरव मोरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आता गौरवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत गौरवच्या हातात एक पुरस्कार पाहायला मिळत आहे. गौरवला 'बॉईज 4' या चित्रपटासाठी गेम चेंजर या श्रेणीतील पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानिमित्ताने त्याने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

"...आणि हा पुरस्कार मला मिळाला"

"फायनली मला Boyz4 साठी Game changer कॅटेगिरीमध्ये अवार्ड मिळाला.सगळ्यांचे मनापासून आभार. विशाल देवरुखकर सरांचे तर मनापासून खूप खूप आभार,राजेंद्र शिंदे आणि लालासाहेब शिंदे ह्यांचे देखील मनापासून आभार. अवधूत गुप्ते सर ह्यांचे पण आभार आणि हा माझा चित्रपटसृष्टीतील पहिला अवार्ड आहे. त्यामुळे हा अवॉर्ड माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्यांना डेडिकेट करतो आणि खास करून मायबाप प्रेक्षकांना डेडिकेट करतो. त्यांच्यामुळेच हे शक्य झाले. त्यांनी वोटिंग केले आणि हा पुरस्कार मला मिळाला आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार रेडिओ सिटीचे मनापासून आभार धन्यवाद", असे गौरव मोरने म्हटले आहे. 

गौरव मोरेच्या या पोस्टवर अनेक कलाकार लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. गौरवच्या या पोस्टवर अभिनेत्री ऋतुजा बागवने 'अभिनंदन' असे म्हटले आहे. तर अभिनेते समीर चौघुले यांनी 'खूप खूप अभिनंदन भावा, खूप प्रेम', अशी कमेंट केली आहे. तसेच पार्थ भालेरावने 'भय्या' अशी कमेंट करत त्यावर हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. 

दरम्यान गौरव मोरे हा सध्या परिनिर्वाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला. 'महापरिनिर्वाण' हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत, विजय निकम, हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x