Kedar Shinde Aaipan Bhari Deva : मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. केदार शिंदे यांनी 'ऑन ड्युटी चोवीस तास', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'अगं बाई अरेच्चा', 'यंदा कर्तव्य आहे' अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून केदार शिंदे हे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 30 जून 2023 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांनी दिलेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता केदार शिंदेंनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. केदार शिंदे यांचा आगामी चित्रपट महिलांवर आधारित असणार आहे. आईपण भारी देवा असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून आईपण निभावणाऱ्या भावनांची मांडणी करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी केदार शिंदे यांनी जिओ स्टुडिओसोबत करार केला आहे. या चित्रपटात ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची टीम काम करणार आहे.
‘बाईपण भारी देवा’ची लेखिका वैशाली नाईक, ओमकार मंगेश दत्त, निर्माती ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे हे सहनिर्माते ‘आईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. केदार शिंदे यांनी नुकतंच या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार, चित्रपटाचे शूटींग कधी सुरु होणार, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. या चित्रपटात मंगळागौरीच्या पारंपरिक खेळाचे सूत्र घेऊन स्त्रीच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मराठीत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आणि गेल्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून बाईपण भारी देवा या चित्रपटाला ओळखले जाते. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने-कुलकर्णी, दीपा परब-चौधरी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान केदार शिंदे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध आहे. 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू.. मी..मी..', 'गेला उडत', 'गोपाळा रे गोपाळा' अशी अनेक नाटक त्यांनी केले आहेत. त्यासोबतच 'हसा चकटफू', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'घडलंय बिघडलंय', 'साहेब बिबी आणि मी' या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. त्यासोबच 'ऑन ड्युटी चोवीस तास', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'अगं बाई अरेच्चा', 'यंदा कर्तव्य आहे', 'महाराष्ट्र शाहीर', 'बाईपण भारी देवा' अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.