'फक्त ब्राह्मणाला धार्मिक विधीचा अधिकार...', किरण मानेंची संतप्त पोस्ट; 'राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून...'

येत्या 22 जानेवारीला संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

Updated: Jan 13, 2024, 03:52 PM IST
'फक्त ब्राह्मणाला धार्मिक विधीचा अधिकार...', किरण मानेंची संतप्त पोस्ट; 'राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून...' title=

Kiran Mane On Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे सध्या अयोध्येसह ठिकठिकाणच्या राम मंदिरात जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येतील राम मंदिरात 16 जानेवारीपासूनच विविध विधींना सुरुवात होणार आहे. यावरुन आता राजकारण सुरु आहे. अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आता यात अभिनेते किरण माने यांनी उडी मारली आहे. 

किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतम बुद्ध यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबतच त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राममंदिर उद्घाटन सोहळ्याबद्दल भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

किरण माने यांची पोस्ट
 
"राममंदिर उद्घाटन सोहळा अनेक गोष्टींची पोलखोल करणारा ठरलाय यात शंका नाही. जरा खोलात जाऊन सांगतो भावांनो. ज्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनावर बहिष्कार टाकलाय... त्यातले एक शंकराचार्य निश्चलानन्द सरस्वती महाराज यांनी मागे उघडपणे सांगीतले होते की, 'मनुस्मृती हे जगातलं पहिलं आणि एकमेव संविधान आहे.' ओके. ठीकै. आता या बहिष्काराचं कारण शोधण्यासाठी मी मनुस्मृती वाचली. त्यातल्या काही नियमांकडं माझं लक्ष गेलं... मनुस्मृतीच्या चौथ्या अध्यायात स्पष्टपणे सांगीतले आहे की, 'धार्मिक विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे. त्याव्यतिरीक्त कुणी शुद्राने ते करू नये. शुद्राला ते सांगूही नयेत. अन्यथा नरक भोगावे लागते.' मी विचार करू लागलो, हे तर कारण नसेल शंकराचार्यांच्या बहिष्काराचे???

दुसरं म्हणजे, पौष महिना म्हणे हिंदू धर्मात धार्मिक कार्यांसाठी अशुभ मानला जातो. त्या अंगाने पहायचं ठरवलं तर... याच चौथ्या अध्यायात मनुने हे ही स्पष्ट सांगीतले आहे की, 'धार्मिक कार्यात डामडौल, दिखाऊपणा करणारे, मुहुर्ताचे बंधन न पाळणारे हे सर्व नरकवासाच्या शिक्षेला पात्र आहेत.' हे ही कारण असेल कदाचित. असो. एकंदरीत राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून होत आहे, त्यामुळे ही नाराजी आहे, असे सध्या तरी वाटतेय. नाही का? राजकिय फायद्यासाठी हे चाललेय असे धर्मगुरूंचे मत आहे. म्हणजे या लोकांचे मनुस्मृतीला उडवुन लावणे हे सामाजिक समता आणि न्यायासाठी नाही, असा त्याचा अर्थ होतो.

आता तुम्ही म्हणाल ते आपापसात बघून घेतील, हे सगळं इस्कटून सांगायचं कारण काय? तर माझ्या भावाबहिणींनो, आता मनुवाद्यांचे हिंदुत्व आणि राजकिय हिंदुत्व यात उडालेली ठिणगी आपण बारकाईनं बघण्याची योग्य वेळ आहे... म्हणजेच वारकरी संप्रदायाने सांगीतलेला, छ. शिवरायांनी जपलेला, प्रबोधनकार ठाकरेंनी उलगडलेला आपला खरा मानवतावादी हिंदु धर्म लखलखून उजळलेला दिसेल. मनुस्मृती जाळून बुद्धांच्या मार्गावर गेलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरही मनाच्या तळापासून कळतील आणि बुद्धीला पटतील... जय शिवराय जय भीम", असे किरण माने यांनी म्हटले आहे.

दरम्यान सोमवारी 22 जानेवारीला संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी ही सज्ज होत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत.