'हा माझ्या बायकोचा पायगुण', प्रसाद जवादे असं का म्हणाला?

अभिनेत्री अमृता देशमुख ही सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकात झळकत आहे. तर अभिनेता प्रसाद जवादे हा झी मराठीवरील 'पारु' या मालिकेत झळकत आहे. 

Updated: Feb 21, 2024, 06:09 PM IST
'हा माझ्या बायकोचा पायगुण', प्रसाद जवादे असं का म्हणाला? title=

Prasad Jawade On new serial : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणून अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेला ओळखले जाते. गेल्यावर्षी अमृता आणि प्रसाद विवाहबंधनात अडकले. त्या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यानंतर आता ते दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आहेत. अभिनेत्री अमृता देशमुख ही सध्या नियम व अटी लागू या नाटकात झळकत आहे. तर अभिनेता प्रसाद जवादे हा झी मराठीवरील पारु या मालिकेत झळकत आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्याने पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण केले आहे. 

"हा प्रवास नक्कीच यशस्वी होईल"

प्रसाद जवादे हा पारु या मालिकेत आदित्य किर्लोस्कर हे पात्र साकारत आहे. या मालिकेच्या निमित्तान त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्याला नवीन मालिका आणि खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर त्याने फारच छान पद्धतीने उत्तर दिली. "यंदाच्या वर्षाची सुरुवात कामाने झाली आहे. पारु या मालिकेचे शूटींग साताऱ्यात सुरु आहे. माझे लग्न झाल्यावर पहिल्यांदाच मी इतक्या दूर शूटींग करत आहे. पण यात मला अमृताची साथ मिळाली आहे. त्यामुळे हा नवीन प्रवास नक्कीच यशस्वी होईल, यात मला शंका नाही. पण एक गोष्ट नक्कीच सांगेन की माझ्या बायकोचा पायगुण फार कमाल आहे", असे प्रसादने सांगितले. 

"स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात"

पारु या मालिकेतील आदित्य किर्लोस्करच्या भूमिकेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माझा मित्र-परिवार तर हेलिकॉप्टरच्या माझ्या एन्ट्रीवर एकदम फिदा आहे. एक श्रीमंत घराण्याचा मुलगा पण आपल्या आईच्या शब्दाबाहेर नसणारा अशी ही व्यक्तीरेखा आहे. मी पुन्हा झी मराठीवर दिसणार असल्याने माझी आई आणि अमृताची आई दोघीही अतिशय खुश आहेत. माझ्यासाठी झी मराठीवर काम करणे म्हणजे घरी परतण्यासारखे आहे. या मालिकेत आदित्य हा एक श्रीमंत घरातील मुलगा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा लूक जबरदस्त असला पाहिजे यासाठी मी गेल्या काही महिन्यापासून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरवात केली. त्या मेहनतीचे फळ मला प्रोमो आणि मालिकेतून मिळाले. आदित्य किर्लोस्करच्या खूप शेड्स आहेत जसा-जसा शो पुढे जाईल तुम्हाला कळेलच, असेही तो म्हणाला. 

प्रसाद आणि आदित्यमध्ये काही साम्य गोष्टीही आहेत. त्या दोघांमध्ये सगळ्यात मोठं साम्य म्हणजे ते आईवर प्रचंड प्रेम करतात. आदित्यला महागड्या आणि स्टायलिश गाड्यांचा खूप शोक आहे आणि प्रसादला ही स्पोर्ट्स कार खूप आवडतात. माझं प्रेक्षकांना इतकंच आवाहन आहे की आतापर्यंत जितकं प्रेम दिलात त्याहुन जास्त प्रेम या भूमिकेला आणि 'पारू' ला द्या, असे प्रसाद जवादेने यावेळी म्हटले.