गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकार नाट्यगृहांची दुरवस्थेबद्दल स्पष्टपणे मत मांडताना दिसत आहेत. अनेक मराठी अभिनेत्रींनी नाट्यगृहांमुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसतात. पण कित्येक वर्षांपासून नाट्यगृहांची परिस्थिती जैसे थेच आहे. नाट्यगृहांच्या दुरवस्थेबद्दलचे गाऱ्हाणे अनेकदा मांडल्यानंतरही प्रशासन निष्क्रियच असल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबद्दल भाष्य केले आहे.
चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि नाटक या चारही माध्यमातून अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखले जाते. तिने मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रिया ही चित्रपटासह नाट्यक्षेत्रातही सक्रीय असते. सध्या प्रिया ही 'जर तरची गोष्ट' या नाटकात काम करताना दिसत आहे. या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे सध्या या नाटकाचे अनेक प्रयोगही हाऊसफुल होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता प्रियाच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रिया बापटने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने एका नाट्यगृहाची झालेली अवस्था दाखवली आहे. यात एका नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर संपूर्ण नाट्यगृहात कचरा पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिने हा फोटो पोस्ट करत सर्व प्रेक्षकांना जाब विचारला आहे. "नाट्यगृह स्वच्छ ठेवणं ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार???" असा प्रश्न प्रिया बापटने विचारला आहे. सध्या तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिची ही पोस्टही व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृह, तेथील व्यवस्था, वॉशरुमची दुरावस्था, तिकिटांचे दर, स्वच्छता हे मुद्दे सातत्याने समोर येत आहेत. या मुद्द्यांवर अनेक कलाकार याबद्दल थेट मत मांडतानाही दिसतात. याआधीही मुक्ता बर्वेने एका नाट्यगृहाच्या वॉशरुमचे फोटो टाकत त्या ठिकाणाच्या दुरावस्थेबद्दल सांगितले होते. तसेच विशाखा सुभेदार यांनाही नाट्यगृहांमधील सुविधांच्या अभावावरून भाष्य केले होते. त्यांनी कुठं स्वच्छता नाही, तर कुठं पाणीच नाही. कुठं कँटीनची वानवा, तर कुठं प्यायच्या पाण्याची बोंब, यावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली होती.
दरम्यान सध्या प्रिया बापट ही 'जर तरची गोष्ट' या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. सध्या या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे. या नाटकातून प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करताना दिसत आहे. तसेच तिची सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसीरिजही गाजत आहे.