Radhika deshpande : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून राधिका देशपांडेला ओळखले जाते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रीण देविका हे पात्र साकारलं होतं. तिचे हे पात्र प्रचंड गाजलं. सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. आता राधिकाच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. राधिकाने नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राधिका ही एका वृद्ध आजोबांकडून कोथिंबीर विकत घेताना दिसत आहे. यानंतर तिने ही सर्व कोथिंबीर नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना दिली आहे. तिने हे करण्यामागचे कारणही सांगितले आहे.
"दिवस मोठा होता. काल प्रभू श्री राम आले. सर्वत्र आनंद ओसंडून वाहत होता. एका कोपऱ्यात हे आजोबा बेंबीच्या देठापासून चाळीस रुपयाला एक जुडी विकायचा प्रयत्न करत होते. त्यांचा आवाज काही सेकंद माझ्या कानात घुमत राहिला. एकीकडे नाटकाच्या प्रयोगाची पहिली घंटा वाजली होती. पण हे काम मला करायचं होतं. आजच. कोणतं? व्हिडिओ बघा.
माझी आई म्हणते, “काही ठिकाणी भाव करायचा नाही. तर काही ठिकाणी भाव केल्याशिवाय काहीही विकत घ्यायचं नाही.” संपूर्ण दुकान विकत घेतलं न भाव करता. पोटासाठी काम करणारे आजोबा आज पोटभर नक्की जेवतील ह्याची सोय केली. दिवस रामाचा. काम रामाचं. एखाद्या नाटक सिनेमातला प्रसंग आठवला “महाराज, अभिनंदन! राणी सरकार ला मुलगा झाला.” मग राजा कसलाही विचार न करता त्याच्या गळ्यातली रत्नजडित माळ सुईणीला देतो. तसचं काहीसं. आनंद तर मलाही झाला होता प्रचंड. मी ही राणी सरकार असल्यासारखा आनंद लुटला. दिसेल त्याला कोथिंबीर वाटत सुटले. नाटकातल्या कलाकारांनी माझ्या ह्या कामाचे स्वागतच केले. आणि आनंदानी कोथिंबीर घरी नेली. आईने जे सांगितले ते माझ्या मुलीला मी सांगितलेच आहे पण त्यात एक जुडी आणखीन जोडीन. “अंतरा, आयुष्यात काही दिवस असे येतील त्या दिवशी भाव करायचा नाही. आणि चांगले काम केले हे सांगताना भाव खायचा नाही. त्या आजोबांच्या घरी दिवाळी आली का नाही माहित नाही पण मी मात्र दिवाळी अशी साजरी केली. कारण दिवस मोठा होता. आणि मन मोठं का छोटं, ते कसं मोजता येईल? मनात राम होता आणि तो मनात घर करून राहिला!", असे राधिका देशपांडे म्हणाली.
राधिका देशपांडेच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करतानाही दिसत आहेत. एकीने तिच्या या व्हिडीओवर "खूप छान" अशी कमेंट केली आहे. तर एकाने "लय भारी.. तुम्ही त्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू आणलं.. आयुष्यात तुमच्या चेहऱ्यावर पण असचं हसू राहिलं", असे म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.