Vishakha Subhedar Instagram Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे लोकप्रियता आलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. विशाखा सुभेदारने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. सध्या विशाखा या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत खलनायिकेचे पात्र साकारत आहे. त्यासोबच विशाखा सुभेदारने चित्रपटातही उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता विशाखाला तिच्या सिनेसृष्टीतील कामगिरीसाठी एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने याबद्दल केलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्राचा उल्लेख केला आहे.
विशाखा सुभेदार ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी चाहत्यांना तिच्या आयुष्यातील विविध घटनांबद्दल माहिती देताना दिसते. आता विशाखाला तिच्या सिनेसृष्टीतील उत्तम कामगिरीसाठी यंदाचा राम नगरकर पुरस्कार मिळाला आहे. विशाखाला हा पुरस्कार दिग्दर्शक-निर्माते सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्याकडून मिळाला आहे. तिने याबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी विशाखाने पुन्हा एकदा विनोदी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
"राम नगरकर पुरस्कार सोहळा...2024. हा पुरस्कार ह्या माझ्या गुरु स्थानी असलेल्या दोन सचिन मास्तर ह्यांच्याकडून मिळाला हे ही माझं भाग्य. हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर हे हयात नाही ह्याचे मात्र वाईट वाटले. फू बाई फू ते हास्यजत्रा.. विनोदी प्रहसन सादर करीत आले, त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं कीं जबाबदारी आलीच.. जरी हास्यजत्रातून बाहेर पडले ह्याचा अर्थ असा नाही होत कीं विनोदी अभिनय करण सोडलं.. एक ब्रेक घेतला होता पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच...रसिकांचे आणि नगरकर कुटुंबियांचे खुप आभार...", असे विशाखा सुभेदार म्हणाली.
विशाखा सुभेदारच्या या पोस्टवर अभिनेता समीर चौघुलेने कमेंट केली आहे. "खूप खूप अभिनंदन विशू", अशी कमेंट समीर चौघुलेंनी केली आहे. त्यासोबतच अनेक चाहतेही तिचे अभिनंदन करत कमेंट करताना दिसत आहेत.
दरम्यान विशाखा सुभेदार ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत झळकत आहेत. यात त्या रागिणी हे खलनायिकेचे पात्र साकारताना दिसत आहे. 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' सोहळ्यात तिला 'सर्वोत्कृष्ट खलनायिका' पुरस्काराने गौरवण्यात आले. या व्यतिरिक्त अनेक चित्रपटात काम देखील केलं आहे.